खेड पोलीस निरीक्षक निशा जाधव यांचे सतर्कता बाळगण्याचे आवाहन
खेड / प्रतिनिधी
सोनार व्यावसायिक असून देवाला दान करण्यासाठी आलो असल्याची बतावणी करत महिलांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. या बाबत नागरिकांनी सतर्कता बाळगून अशाप्रकारची बतावणी कोणी करत असल्यास थेट पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केले आहे.
एका अनोळखी इसमाने 55 वर्षीय महिलेस साई मंदिर परिसरात थांबवून व्यवसायाने सोनार असल्याचे सांगत आपल्याला देवाला दान करायचे आहे, असे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेच्या हातात आधी 100 रूपयाची नोट व त्यानंतर प्लास्टीकच्या पिशवीत 100 रूपयांच्या 3 नोटा व बिस्कीट पुडा दिला. यानंतर महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील सोनसाखळी प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून ठेवण्यास सांगत थोड्यावेळाने घटनास्थळावरून पलायन केले. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून भामट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. शहरात घडलेले प्रकार ग्रामीण भागातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महिलांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.