पुणे / प्रतिनिधी :
शहरात एकीकडे मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना सिंहगड पोलिसांनी मोठी कारवाई करत चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय कर्नाटक येथील टोळीला जेरबंद केले. याप्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचे तब्बल 84 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
शरथ मंजुनाथ (21), केशवा लिंगराजु (24) आणि नवीन हनुमानथाप्पा (19, तिघेही रा. हनुमंतनगर, हौसमाने मारीअम्मा मंदीराजवळ, शिमोगा कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत किशोर राम कोलारकर (62, रा. नवले ब्रीज जवळ) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक वाचा : मी तुम्हाला महाराष्ट्रात नकोय का?, लोकसभा लढविण्याच्या मुद्यावर फडणवीसांचा सवाल
फिर्यादी कोलारकर दि. 29 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास हिंगणे खुर्द येथील जगताप हॉस्पीटल समोर भाजीपाला खरेदी करत असताना तिघांनी त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करून पोबारा केला होता. त्यानंतर कोलारकर यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. हद्दीत घडणाऱ्या मोबाईल, जबरी चोरीच्या अनुषंगाने सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या सुचनेनुसार सिंहगडरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी पथकातील अमंलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर यांना मोबाईल चोरटे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फनटाईम थिअटरच्या परिसरात थांबले असल्याची खबर मिळाली. त्यानुसार तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी यावेळी तिघांना त्यांच्याकडे असलेल्या दोन बॅगेसह ताब्यात घेतले. एका बॅगेत 41 दुसऱ्या बॅगेत 42 तर त्यातील एका चोरटय़ाजवळ एक असा असे तब्बल 15 लाख 25 हजारांचे महागडे 84 चोरीचे मोबाईल फोन पथकाने जप्त केले.
बेसावध नागरिकांना हेरुन हिसकावत होते मोबाईल
अटक करण्यात आलेली टोळी ही आंतरराज्यीय टोळी आहे. ते कर्नाटक येथून पुण्यात येऊन उतरत होते. तसेच शहरात मोबाईलवर बोलणाऱया लोकांना, बेसावध असलेल्या नागरिकांना हेरुन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकाऊन नेत चोऱ्या करत होते. त्यांची आंतराज्यीय टोळी असून त्यांच्या साथीदारांबरोबर चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचाही शोध सुरू आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले मोबाईल कोठून चोरी केले आहेत? त्यांच्या टोळीचा मुख्य सुत्रधार कोण? त्या अनुषंगाने गुन्हे निष्पन्न करण्याचेही काम सध्या सुरू आहे.