पुणे / प्रतिनिधी :
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित, शारदा महिला संघ, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने 16 व्या ‘भीमथडी जत्रे’चे येत्या 21 डिसेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता पुण्यात उद्घाटन होत असून, भरडधान्यासाठी यंदा स्वतंत्र दालन असणार आहे.
2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे. त्यानिमित्त देशभरात भरडधान्याविषयी सर्वत्र जणजागृती सुरू असून, भरडधान्य ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर हळूहळू वाढत चालला आहे. रोजच्या आहारातील गहू , तांदूळ यामध्ये असलेले ग्लूटेन व कार्बोहायड्रेड हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहेत. तर ज्वारी, बाजरी, मका, नाचणी ही भरडधान्यच असून त्यामध्ये कमी प्रमाणात न्यूट्रियंट असतात. त्याही पुढे पॉझिटिव्ह मिलेटमध्ये राळे, भगर, सावा, बर्टी, वरई या प्रकाराची भरडधान्य आरोग्यास उत्तम असून यांच्या नियमित सेवनाने बरेच आजारदेखील बरे होतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. वरील सर्व प्रकारच्या भरडधान्यांपासून आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे विविध पदार्थ बनविता येतात, हे आपण भीमथडीमध्ये पाहणार आहोत.
अधिक वाचा : महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…; बावनकुळेंचं विधान चर्चेत
भीमथडीमध्ये वरील सर्व प्रकारची धान्य, तसेच या पासून बनविलेली पीठे, पास्ता,पापड, न्यूडल्स, रागी, बिस्कीट, ढोकळा, डोसा, इडली, पोहे, लाडू, आंबील, कुकीज, चकली, कुरकुरे, दलिया, थालीपीठ, उपमा, खाकरा, खीर असे कितीतरी प्रकार पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. आपण केलेल्या खरेदीच्या जोरावर शेतकरी बांधवांना पिकाचा नवीन प्रकार उपलब्ध होणार आहे. दिनांक 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भिमथडीला पुणेकरांनी आवर्जून भेट दयावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.