प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे (अभाविप) 42 वे राज्यस्तरीय अधिवेशन शुक्रवारपासून बेळगावमध्ये सुरू आहे. या अधिवेशनानिमित्त शनिवारी शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने युवावर्ग व विद्यार्थी सहभागी झाले होते.
नेहरुनगर येथील जेएनएमसीपासून रॅलीला सुरुवात झाली. अयोध्यानगरमार्गे चन्नम्मा सर्कल, काकतीवेस रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोडमार्गे लिंगराज कॉलेज येथे सायंकाळी सांगता झाली. या रॅलीमध्ये धनगरी ढोलांसोबत विविध पथनाट्या व कलाकार सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. भगवे ध्वज व भगवी वस्त्रे परिधान करून हजारो युवक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
युवकांमध्ये देशभक्ती रुजावी, त्याचबरोबर त्यांना विविध तज्ञांमार्फत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने राज्यस्तरीय अधिवेशन बेळगावमध्ये भरविण्यात आले आहे. यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. केएलईच्या जिरगे सभागृहात सुरू असलेल्या या अधिवेशनाची रविवारी सांगता होणार आहे.