बेळगाव शहर हादरले : शाळेतील भांडणानंतर अपहरण करून खून, संशयितांचा शोध जारी
प्रतिनिधी / बेळगाव
पाचवा क्रॉस, शिवाजीनगर येथील दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा भीषण खून करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी मुचंडी (ता. बेळगाव) जवळील आमराईत त्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने सारे शहर हादरले आहे. शाळेत झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
प्रज्वल शिवानंद करेगार (वय 16, रा. शिवाजीनगर-पाचवा क्रॉस) असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील जी. ए. हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. गुरुवारी सकाळी मुचंडीजवळील एका आमराईत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात भा.दं.वि. 363 व 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर, कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुरुवातीला अनोळखीचा मृतदेह अशीच त्याची ओळख होती. घटनास्थळी आढळलेल्या शाळेच्या बेल्टमुळे तातडीने त्याची ओळख पटली.
प्रज्वलचे वडील शिवानंद करेगार यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी प्रज्वल शाळेला गेला होता. शाळा सुटल्यावर तो घरी परतला नाही. प्रज्वलचा लहान भाऊही जी. ए. हायस्कूलमध्येच शिकतो. प्रज्वल घरी पोहोचला नाही म्हणून कुटुंबियांची चिंता वाढली. सुरुवातीला त्यांनी मार्केट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात जाऊन रात्री आपला मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
कॅम्प पोलिसांनी बिनतारी यंत्रणेवरून यासंबंधीची माहिती देऊन शहरातील सर्व पोलीस स्थानकांना सतर्क केले. गुरुवारी सकाळी मुचंडीजवळील आमराईत अनोळखीचा मृतदेह आढळल्याची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली. दुपारी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. खून झालेला प्रज्वल हा दहावीचा विद्यार्थी होता हे समजताच तपास अधिकारीही चक्रावले. कारण विद्यार्थ्याचा खून कोण व कशासाठी करणार? असा प्रश्न तपास अधिकाऱयांना पडला.
प्रज्वलच्या अंगावर कपडेही नव्हते. केवळ अंडरवेअरवर मृतदेह आमराईत पडला होता. तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर दगडाने ठेचल्याचे दिसून आले आहे. पंचनाम्याचा सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
मोटारसायकलवरून अपहरण?
मोटारसायकलवरून अपहरण करून प्रज्वलचा खून केल्याचा संशय बळावला आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. शाळा सुटल्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येत आहेत. शाळेत झालेल्या भांडणानंतर विद्यार्थ्याचे अपहरण करून खून केल्याचा संशय असून पोलीस मारेकऱयांचा शोध घेत आहेत. अटक झाल्यानंतरच खुनाचे कारण बाहेर पडणार आहे.