रविंद्र शिदे / मुरगुड
शरीराने धडधाकट आणि धष्टपुष्ट असणारा नागरिक सैन्य सेवेत दाखल होण्याचे स्वप्न पाहू शकतो. अपार मेहनतीतून तो हे स्वप्न सत्यात उतरवूही शकतो. पण सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न अपंगत्वाचा शाप लाभलेल्या एखाद्याने बाळगले तर ते दिवास्वप्न वाटू शकते. पण दुर्दैवाने जन्मतःच . अपंग असलेल्या बेनिक्रे (ता. कागल) येथील निखिल एकनाथ मस्कर यांने अपंगत्व ही संधी समजून बालपणापासून सैन्य दलात भरती होण्याचे आपले स्वप्न साकार केले.
उजव्या हाताने जन्मतः 50 टक्के अपंग आलेल्या निखिल एकनाथ मस्कर या 25 वर्षीय युवकाची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली. या भरतीचे सर्व श्रेय तो मुरगूडातील विनर करिअर अकॅडमी फाउंडेशनला देतो. ध्येयाने वेडे झालेल्या अनेकांनी अपंगत्वावर मात करून स्वप्ने साकार केल्याची उदाहरणे आहेत. निखिलने सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगत शैक्षाणिक वाटचाल केली. भारतीय सैन्य दलात ’लष्कर सिव्हिल’ या पदावर भरती होण्यासाठी तो सज्ज झाला आहे. यासाठी त्याला नुकतेच अपॉइंटमेंट लेटर मिळाले. मुरगुडमध्ये गेली दीड वर्षे तो स्पर्धा परीक्षेतील शारीरिक व बौद्धिक पेपरची तयारी करत होता.
स्थानिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर हळदीच्या चौंडेश्वरी हायस्कूलमध्ये त्यांने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मुरगुडच्या शिवराज ज्युनिअर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक वाणिज्य विभागात बारावी पूर्ण केल्यावर कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये पदवी शिक्षण ( बी. कॉम.) पूर्ण केले. त्यानंतर मुरगुडात स्पर्धा परीक्षेची कसून तयारी केली. टेलिग्रामच्या जाहिरातीवरून केलेल्या अर्जानंतर पुण्यातील बीजी सेंटर येथे त्याने ऑफलाइन परीक्षा दिली. देशभरातून या परीक्षेसाठी आलेल्या पंधरा विद्यार्थ्यांपैकी निखिल यशस्वी ठरला. 20 किलो वजनाचे पोते घेऊन 200 मीटर धावण्याच्या निवड चाचणी घेण्यात आली. लेखी परीक्षेमध्ये अव्वल ठरलेला निखिल अकॅडमी जॉईन केली असल्याने या निवड चाचणीत सहजगत्या यशस्वी झाला आणि तो या पदासाठी पात्र ठरला. रीतसर निवडीचे पत्र त्याला नुकतेच प्राप्त झाल्यामुळे तो सेवेसाठी रुजू होणार आहे.
या पदावरील भरतीनंतर निखिलला वरिष्ठ सैन्य अधिकायांकडे स्विय सहाय्यक म्हणून कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. असे एका जेष्ठ सेवानिवृत्त लष्कर आधिका-याने सांगितले. प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावरच बेनिक्रेसारख्या डोंगराळ भागातून लष्करामध्ये अपंग कॅटॅगरीतून मिळालेली एकमेव जागा पटकावण्यामध्ये निखिलला यश मिळू शकले. शेतमजूर वडील आणि अंगणवाडी सेविका आई अशा सामान्य कुटुंबातील निखिलच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.