थक्क करणारी कलाकृती
अनेक प्रकारच्या डिझाइन अजब गोष्टींमध्ये तयार केल्याच्या कलाकृती तुम्ही पाहिल्या असतील. कुणी लाकडावर कलाकृती तयार करून तर कुणी दगडावर डिझाइन तयार करून सुंदर गोष्टींची निर्मिती करत असतो. परंतु सध्या एका कलाकाराकडून तयार करण्यात आलेली कलाकृती चर्चेचा विषय ठरली आहे. यात त्याने दगड किंवा लाकूड नव्हे तर अक्रोडसारख्या छोटय़ा गोष्टीत सुंदर कलाकृती तयार केल्या आहेत.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओत एक कलाकार अक्रोडचा वापर करत सुंदर डिझाइन तयार करताना दिसून येतो. अक्रोडच्या आत त्याने थक्क क्हायला होइंल अशा गोष्टी तयार केल्या आहेत. कलाकाराने अक्रोडच्या दोन्ही भागांना दरवाजाला लागणाऱया बिजागरांशी जोडले आणि त्यात सुंदर डिझाइन तयार केली आहे. यात एक पूर्ण बुक शेल्फ दिसून येत असून यात अनेक पुस्तके ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येते. जिना, दिवा आणि तसवीरही यात दिसून येते. त्यानंतर डिझाइनमध्ये त्याने बेडरुमचा लुक दिला आहे. त्यावर बेड आणि सुंदर पडदेही दिसून येत आहेत. तिसऱया डिझाइनमध्ये रीडिंग रुम नजरेस पडते, पुढील डिझाइनमध्ये छोटे प्राणी, टेबल-चेअर इत्यादी कलाकृती तयार केल्या आहेत. या व्हिडिओला 35 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर 1 लाखाहुन अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. अनेक लोकांनी कॉमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारच्या कलाकृतीसह असलेला अक्रोड 13 हजार रुपयांमध्ये मिळत असल्याचा दावा एका महिलेने केला आहे.