बेडरूममधील साहित्य जळून झाले खाक
चिपळूण प्रतिनिधी
शहरातील पागमळा येथील परांजपे स्कीमच्या बी-2 या इमारतीमधील एका सदनिकेला गुरूवारी दुपारी 12 वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात बेडरूममधील साहित्य खाक झाल्याने सुमारे 5 लाख 85 हजार रूपयांचे नुकसान झाले. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन बंबासह अनेकांनी धाव घेऊन ही आग 1 तासांच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
ही सदनिका सई सचिन पेठे यांच्या मालकीची आहे. त्यामध्ये नीलम भाऊसाहेब नलावडे या गेल्या 3 वर्षापासून भाड्याने राहत आहेत. गुरुवारी दुपारी 12 वाजता अचानक बेडरूमममधून धुराचे लोळ निघू लागले आणि काही क्षणातच आग भडकली. हा प्रकार अन्य नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी यी माहिती नगर परिषदेला दिली. त्यानुसार काही वेळातच अग्निशमक बंब दाखल झाला. त्याच्यातून पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. यासाठी शेकडो नागरिकाची मदतही कामी आली.
या आगीत बेडरूममधील कपडे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. आगीचे वृत्त समजताच पोलीस, महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडल अधिकारी, तलाठी यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार नलावडे याचे 5 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे लक्षात येताच सदनिकेतील महिला व मुलांनी बाहेर धाव घेतल्याने ते बालंबाल बचावले.