Tarun Bharat

मच्छे ब्रह्मलिंग यात्रेला भाविकांची अलोट गर्दी

हर हर महादेवाच्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम : गाव मर्यादित कुस्ती आखाड्याचे आज आयोजन

वार्ताहर /मच्छे

मच्छे येथील जागृत ब्रह्मलिंग यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. ब्रह्मलिंग मंदिरासमोर सायंकाळी हर हर महादेवाच्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम झाला. यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती.

यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी गाड्यांची मिरवणूक काढून इंगळ्यांसाठी लागणारी लाकडे मंदिराजवळ आणण्यात आली. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी ब्रह्मलिंग मंदिर येथून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर ही पालखी संपूर्ण गावभर फिरून गावातील सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. सकाळी ब्रह्मलिंग मूर्तीला पुजारी व हक्कदारांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरात मंगळवारी दिवसभर विविध धार्मिक झाले. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यात्रेला येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान कमिटी व माजी सैनिक संघटना आणि गावातील विविध संघटना, तरुण कार्य करीत असतानाचे दृष्य पाहावयास मिळाले.

यात्रेनिमित्त व ज्या भक्तांना इंगळ्यांमधून जायचे होते त्यांनी दिवसभर उपवास केला. सायंकाळी सहाच्या दरम्यान पुजाऱ्यांनी विधिवत पूजा-अर्चा केली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांचा गजर सुरू झाला. हर हर महादेव असा जयघोष करत भक्त इंगळ्यांमधून पळत होते. भक्तांनी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या.

  कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दोन वर्षे यात्रा केवळ साध्या पद्धतीने करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाले असल्यामुळे या यात्रेला व इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा हावळ, उपाध्यक्ष सुरेश लाड, सेक्रेटरी संजय सुळगेकर, नागेश गुंडोळकर, बसवंत नावगेकर, अन्नू पाटील, शंकर बेळगावकर, शिवाजी चौगुले, पिंटू बेळगावकर, निंगाप्पा नावगेकर आदींसह गावातील प्रमुख मंडळी यात्रेच्या योग्य  नियोजनासाठी प्रयत्न करीत होते.

रात्री नऊ वाजेपर्यंत भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी पुन्हा गावाकडे पालखीचे प्रस्थान झाले. ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त बुधवारी दुपारी ब्रह्मलिंग मंदिरासमोर गाव मर्यादित कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

यमकनमर्डीत अज्ञाताकडून गोळीबार

Patil_p

कडोली भागातील रयत संघटनेचा उद्या मोर्चा

Patil_p

अवघे शहर लखलखले

Amit Kulkarni

महाराष्ट्राच्या सागरने संगमेशला दाखविला घिस्सा

Amit Kulkarni

संततधार पावसाने शेतकरी हतबल

Patil_p

येळ्ळुरात चिमुकल्यांनी साकारला राजहंसगड

Patil_p