कार्वे-चंदगड(कोल्हापूर); शिवसेनेतील बंड आता राज्यभरातून गावोगावी पोहचत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात शिवसेनेला व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का मिळणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड सीमाभागांपर्यंत पोचल्याची चर्चा सध्या चंदगडमध्ये आहे. उपजिल्हाप्रमुख सोडले तर सर्वपदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेच्या गटात जाण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता नात्याचा परिणाम चंदगड तालुक्यातील शिवसेनेवर ही होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेत चलबिचल सुरू होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शिवसेनेतील घडामोडीवर आहे. चंदगड तालुक्यातील शिवसेनेत ही बाहेरून दिसणारी एकी अंतर्गत वादातून ढवळून निघाली आहे. त्यामुळे येथेही शिवसेनेत मोठे बंड होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरात घडत असलेल्या आरोप प्रत्यारोपाचे परिणाम येथेही दिसत आहेत. काही जुने व नवे शिवसैनिक प्रत्यक्ष पदाधिकाऱ्याना भेटून मोर्चेबांधणी करत आहेत. एकीकडे चंदगड तालुक्यातील शिवसेना भक्कम असल्याचे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे भासत असले तरी सर्व काही आलबेल आहे अशी परिस्थिती नक्कीच नाही. या सर्व घडामोडीत पदाधिकारीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक आहेत. अशी परिस्थिती आहे.येत्या दोन तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील जिल्हा पातळीवरील कार्यकरर्त्याना वगळून ही मोर्चे बांधणी सुरू असल्याचे समजते.सद्या काही प्रमुख शिवसैनिक मुबईत ठाण मांडून आहेत. जिल्हापातळीवरील नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री गटात प्रवेश करायचा की, दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करायचा इतकेच बाकी असल्याचे समजते. मात्र चंदगड तालुक्यातील शिवसेनेत फूट अटळ आहे.