Tarun Bharat

समाजसेवेच्या क्षेत्रातील अग्रेसर आणि कार्यदक्ष कार्यकर्त्या सौ. ममता बदामी

Advertisements

सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा

समाजसेवेच्sा संस्कार काही केल्या स्वस्थ बसू देईना. त्यामुळे नोकरीची संधी असूनसुद्धा तो विचार सोडून दिला. गोव्यात एखादा उद्योग किंवा व्यवसाय करणेही शक्य होते. परंतू समाजाचे काही अंशी ऋण फेडण्याची संधी मिळत असेल तर ती सोडायची नाही असा विचार करून स्वतःला समाजसेवेशी जोडण्यात धन्यता मानलेल्या सौ. ममता प्रमोद बदामी तरुण भारतशी बोलत होत्या.

फोंडय़ात समाजसेवेच्या क्षेत्रात कार्यदक्ष आणि कार्यतत्पर म्हणून जाणल्या जाणाऱया सौ. ममता बदामी या मूळ कर्नाटकातील कुंदगोळ गांवच्या. वडिल जमिनदार. आर्थिक सुबत्ता आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी घरात होत्या. लग्नानंतर त्या गेल्या तीस पत्तीस वर्षात गोव्यात स्थायिक आहेत. फोंडय़ातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्या निगडीत आहेत. नागेशी बांदोडा येथील ‘संजीवन’ संस्थेमध्ये संस्थेच्या संस्थापक आणि समाजसेविका सौ. आशा सावर्डेकर यांच्या खांद्याला खांदा भिडवून अडल्यानडल्यांची सेवा त्या करतात. आठवी-दहावी शिकलेल्या मुलांमुलींसाठी नर्सिंग शिक्षण याठिकाणी देण्यात येतं. यामागे ही मुले स्वतःच्या पायावर उभी रहावीत. त्यांनी पिडीताना आणि रुग्णांना त्यांच्या घरी राहून सेवा द्यावी. वृद्धांना असहाय्य परिस्थितीत आधार मिळावा या हेतूने सुरु करण्यात आलेल्या या नर्सिंग प्रशिक्षणाची जबाबदारी सौ. बदामीनी स्वतःकडे घेतलेली आहे. भारतीय संस्कृतीचा पुरस्कार करणाऱया सौ. बदामी यांनी संस्कृत पाठशाळेतील मुलांनाही प्रोत्साहन दिलेले आहे. मुलांनी संस्कृत शिकावे. किमान घरातील देवपूजा करण्याइतके वैदिक शिक्षण लहान मुलांना प्राप्त व्हावे यासाठी गुरु उपलब्ध करून देणे आणि मुलांवर चांगले संस्कार घडावेत. यासाठी गेली अनेक वर्षे त्या आपल्यापरिने सुट्टीच्या काळात कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना एकत्र आणतात.

त्या स्वतः सतारवादक आहेत. आपण आपल्या कुवतीनुरुप सतार वाजवते. परंतू मुलांनी किर्तन, भजन, गाणे, वाद्यवादन शिकावे. त्यासाठी एखाद्या मुलाकडे फी भरण्याची ताकद नसेल तर स्वतः त्याचा भार उचलण्यात त्या स्वतःला भाग्यवान समजतात. फोंडय़ात होणाऱया साहित्यिक कार्यक्रमामध्ये रसिक किंवा मान्यवर म्हणून त्यांचा सहभाग असतो. फोंडय़ातील वाचक सल्लागार समितीशी त्या जोडलेल्या आहेत.

गायन क्षेत्रात पुढे येऊ पहाणाऱया लहान मुलांना गुरुकुल शिक्षण पद्धतीने गुरुकडून तालीम मिळावी. गोव्यातून एखादा राष्ट्रीय पातळीवर नाव करेल असा गुणी विद्यार्थी घडावा यासाठी त्या आग्रही असतात. इथल्या काही मुलांना गोव्याबाहेर गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. भूतदयेला त्या प्राधान्य देतात. प्राणी आणि जनावरांची शुश्रृषा करणे, गरजू जनावरांना औषधोपचार उपलब्ध करून देणे यासाठी त्या स्वतःच्या खिशातून खर्च करतात. कपिलेश्वरी सम्राट क्लबच्या त्या सचिव होत्या अनेक सांस्कृतिक संस्थांशी त्या संबंधित आहेत.

चंगळवाद भोगवादाच्या विळख्यातील युवकांना व्यसनमुक्त करण्यासाटी प्रयत्न करणाऱया संस्थांना त्या सहकार्य करतात. अशा बिघडलेल्या मुलांसाठी समुपदेशन उपलब्ध करून देण्यात त्या सदैव तत्पर असतात. फोंडय़ातील विविध संस्थांच्या उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांचे पती जलस्रोत खात्यात मुख्य अभियंता या सर्वोच्च पदावर काम करतात. समाजसेवेसाठी आपल्या पतीने आपापल्या पूर्ण स्वातंत्र्य दिलेले असून त्यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्यामुळे आपण समाजासाठी काहीतरी करू शकले असे त्या अभिमानाने सांगतात.

सध्या ‘संजीवन’च्या माध्यमातून वृद्ध पिडीत आणि गरजूसाठी कार्य करण्यात मनाला आनंद मिळतो असे सांगतात. याशिवाय इतर अनेक संस्थांशी संबंध असल्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो यासाठी त्या देव आणि जनता जनार्दनाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. अविकसित घटकांसाठी खूप काहीतरी करावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. समाजसेवेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये सौ. ममता बदामी यांचा सगळेच आदर करतात. एखाद्याला मदत करण्यासाठी सरकारी कार्यालयातही स्वतः जाऊन काम करवून घेण्यात त्या स्वतःला धन्य समजतात. त्यांना त्यांच्या समाजसेवी कार्यात यश मिळो ही सदिच्छा.

Related Stories

मांदे मतदार संघाच्या विकासात पत्रकारांचे महत्वाचे योगदान -आमदार सोपटे

Amit Kulkarni

खदयानंद मांद्रेकर यांचा प्रचाराला प्रारंभ

Amit Kulkarni

फोंडय़ातील कचरा व्यवस्थापनासाठी ‘हिलदारी इनिशिएटीव्ह’

Amit Kulkarni

जनतेची तडफड, खनिजाची ओरबड!

Amit Kulkarni

केपेत भाजप समर्थकांनी विरोधी उमेदवाराला रोखून धरल्याने तणाव

Patil_p

‘हेल्थ वे’ मध्ये टाकेविरहित गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Amit Kulkarni
error: Content is protected !!