Tarun Bharat

एक बिबटय़ा; अनेक सुटय़ा!

Advertisements

शोधमोहिमेच्या अपयशामुळे शैक्षणिक नुकसान

सुटी दिलेल्या शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन कसा साजरा करायचा?

प्रतिनिधी/ बेळगाव 

रेसकोर्स परिसरात दहशत माजवून आठवडा उलटला तरी वनखात्याच्या हाताला बिबटय़ा लागला नाही. वनखात्याने रेसकोर्स आणि शेजारील 30 एकर परिसर पिंजून काढला आहे. मात्र अद्याप बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच आहे की दुसरीकडे गेला? याबाबत चिंता व्यक्त होत आहे. शिवाय बिबटय़ासाठी अद्याप किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्नदेखील शहरवासियांना पडला आहे.

जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने रेसकोर्स परिसरात आसरा घेतला आहे. मागील आठवडय़ाभरापासून वनखात्याने शोधमोहीम सुरू ठेवली आहे. मात्र अद्याप याला यश आले नाही. बिबटय़ाच्या शोधासाठी 14 टॅपकॅमेरे, 6 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे आणि 50 कर्मचारी तैनात आहेत. यापैकी एका ट्रप कॅमेऱयात सोमवारी रात्री बिबटय़ाची छबी कैद झाली होती. त्यामुळे वनखात्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बिबटय़ा लवकरच सापडेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अद्याप बिबटय़ा न सापडल्याने वनखात्याची यंत्रणा कुचकामी ठरली आहे.

मागील आठवडाभरापासून वनखात्याने बिबटय़ाला शोधण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला जुंपली आहे. मात्र त्याला म्हणावे तसे यश आले नाही. दरम्यान वादळी पावसामुळे शोधमोहिमेत अडथळा निर्माण झाला होता. शुक्रवारपासून काही प्रमाणात पाऊस ओसरला असला तरी बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. अखेर बिबटय़ा गेला कुठे? असाच प्रश्न सर्व बेळगावकरांना पडला आहे.

आठवडा उलटला तरी अद्याप बिबटय़ा सापडला नसल्याने स्वातंत्र्यदिनही बिबटय़ाच्या दहशतीखालीच साजरा होणार का? अशी चिंता स्थानिक रहिवाशांना लागली आहे. शिवाय बिबटय़ामुळे मागील आठ दिवसांपासून परिसरातील शाळांना सुटी दिली आहे. अद्याप बिबटय़ा सापडला नाही. त्यामुळे सुटी दिलेल्या शाळांमध्ये 15 ऑगस्ट कसा साजरा करायचा? शिवाय विद्यार्थ्यांना बोलवायचे की नाही? हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

मागील चार दिवसांत मानवी वस्तीत वन्यप्राणी शिरकाव केल्याच्या घटना वाढल्या आहेत. येडुरवाडी, बेळगाव, मुडलगी येथे बिबटय़ा तर भुतरामहट्टी येथे हरिण आणि मोदगा येथे तरस आढळले आहे. त्यामुळे वनखात्याची झोप उडाली आहे. मानवी वस्तीत येणाऱया वन्यप्राण्यांना रोखण्याचे आव्हानदेखील वनखात्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे येत्या काळात मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी वनखात्याच्या हाताला लागतात का? हेच पहावे लागणार आहे.

Related Stories

विविध मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांचा मोर्चा

Amit Kulkarni

महागाईसह भाजपविरोधात मुस्लीम बांधवांची निदर्शने

Amit Kulkarni

अबब..! माणसे की बकरी?

Amit Kulkarni

रोहन कोकणेची अखिल भारतीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

Rohan_P

नुकसानग्रस्त शेतीच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात

Amit Kulkarni

जलद कृती दलाच्या जवानांचे अनगोळ परिसरात पथसंचलन

Amit Kulkarni
error: Content is protected !!