फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांची माहिती : विद्यमान कार्यकाळात अद्ययावत बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्नशील
प्रसाद नागवेकर /मडगाव
फातोर्डावासियांना विश्वासात घेऊन तसेच त्यांच्या संमतीने मागील 10 वर्षांत भरघोस विकासकामे राबविण्यात आली आहेत. हाच विकासकामांचा क्रम यापुढे सुरू राहणार आहे. त्यात प्रामुख्याने अद्ययवत बसस्थानक उभारण्यासाठी आपले यंदाच्या कारकिर्दीत प्रयत्न राहतील, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तसेच फातोर्डाचे सलग तिसऱयांदा आमदार बनलेले विजय सरदेसाई यांनी सांगितले आहे.
2012 साली पहिल्यांदा आमदार बनलो असता वाढती रहदारी लक्षात घेऊन फातोर्डातील रस्ते रूंदीकरणावर भर देण्यात आला. यात विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेडियममार्गे चौगुले शोरूम व पुढील रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. चौगुले शोरूमजवळ रहदारीची कोंडी होत होती. त्यात सुधारणा करण्यात आली. चार मीटरचा रस्ता 15 मीटर करण्यात आला. यासाठी लोकांना विश्वासात घेऊन त्यांची जागा रस्त्यासाठी घेताना त्यांना त्यांची घरे-इमारतींचे वाढीव बांधकाम करण्यासाठी मुभा देण्यात आली, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
सत्तेत नसताना रस्त्याचे काम मार्गी
‘ओडीपी’त आराखडा सादर करताना बांधकाम वाढीचे लोकांना ‘इन्सेंटिव्ह’ देऊन आणि रस्ता-सेटबॅकसाठी जागा सोडून काही आवश्यक जागा त्यांच्याकडून घेण्यात आली व चार मीटरचा वरील रस्ता जिल्हाधिकारी कार्यालय ते आगाळीपर्यंत 15 मीटरचा करण्यात आला. हे सर्व सत्तेत नसताना आपण केले, असे त्यांनी सांगितले. ब्रिक्सचे प्रतिनिधीमंडळ सदर रस्त्यावरून जाणार असे सांगून सुमारे 45 कोटी खर्चून 2014 मध्ये उभारण्यात आलेला हा रस्ता आजपर्यंत उत्तम स्थितीत आहे व यामुळे रहदारी सुरळीत होण्यास मोठा हातभार लागला आहे, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले.
भू-गटार वाहिन्यांसह अनेक प्रश्न मांडले
आर्लें ते शिरवडे भू-गटार वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यासाठी आपण आवाज उठविला. कारण येथील जीर्ण भू-गटार वाहिनीतील सांडपाण्याला गळती लागून ते लोकांच्या शेतात जाऊन शेतजमिनी खराब होण्याबरोबरच पाण्याचे स्रोत नष्ट होत होते. याखेरीज अद्ययावत बस स्थानक उभारण्याची गरज, भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण करणे हे प्रश्न विधानसभेत मांडले, अशी माहिती त्यांनी दिली.
‘संडे डायलॉग’खाली जनतेशी संपर्क
पहिल्यांदा मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो होतो व 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दक्षिण गोव्यात पाठिंबा दिल्याने सत्ताधारी भाजपाने आपली विकासकामे करणे टाळली. तरी यादरम्यान आपण ‘संडे डायलॉग’ शीर्षकाखाली फातोर्डातील विविध प्रभागांतील जनतेशी संपर्क साधून त्यांना सतावणाऱया समस्या जाणून घेताना त्यांना अपेक्षित विकासकामांची यादी तयार केली, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
सत्तेत आल्यानंतर बहुतेक कामे मार्गी
2017 मध्ये जेव्हा मी सरकारात होतो तेव्हा लोकांची बहुतेक कामे पूर्ण केली. उत्तरेकडील प्रमुख भू-गटार वाहिनीचे जे 300 कोटींचे काम होते ते मार्गी लावले. ते काम आता पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. हे काम भूमिगत असल्याने दृष्टीस पडत नसले, तरी लोकांसाठी हे भू-गटार अत्यंत आवश्यक असल्याने आपण ते काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले, असे सरदेसाई यांनी सांगितले.
आर्लें ते रवींद्र भवन रस्त्याचे रूंदीकरण
आर्लें ते रवींद्र भवन रस्त्याचे रूंदीकरण हेही आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे काम आहे. 1992 च्या सुमारास मामा कार्दोज आमदार असताना 5 रुपये असा भूसंपादनाचा दर ठरविण्यात आला होता. 5 रु. दराने कोणी जमिनी देण्यास पुढे येत नव्हते. आपण लोकांना ‘एफएआर’ वाढवून दिला व लोकांनी जमीन दिली. पुढे यातून ‘फॉरवर्ड ऍव्हेन्यू’ तयार झाला. यात दूरध्वनी केबल, ऑप्टिक फायबर केबल, पाणी व वीजवाहिन्या यासाठी रस्त्याच्या बाजूला सुविधा उभारून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून रस्ता खोदण्याची गरज पडणार नाही. 1.8 किलोमीटरचा हा रस्ता गोव्यातील पहिलाच अशा प्रकारचा स्मार्ट रस्ता बनला, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
मासळी मार्केटच्या कामांना चालना
माडेलचे घाऊक मासळी मार्केट अद्ययावत बनवण्यासाठी सुमारे 14 कोटींची तरतूद मी मंत्री असताना करून घेतली. नंतर ते काम तसेच राहून गेले. आता हाच निधी वापरून ते काम पुन्हा सुरू झाले आहे. त्याशिवाय किरकोळ मासळी मार्केटचे दुबई मार्केटच्या धर्तीवर सुविधा राबवून सुशोभिकरण केले, असे त्यांनी सांगितले. आपण बसस्थानक, सुसज्ज सभागृह, फॅब इंडिया ते आगाळीपर्यंत बायपाससारखा रस्ता उभारण्यासाठी प्रयत्नशील होतो. सत्तेत असतो, तर आतापर्यंत ही कामे आपण मार्गी लावली असती, असे त्यांनी सांगितले.
केवळ फातोर्डातील मार्गावर स्टिल्टची सोय
वेस्टर्न बायपासवर स्टिल्ट पुलाची गरज आहे असे सांगून आम्ही आवाज उठविल्यानंतर सुमारे 140 कोटी खर्चून या बायपासच्या मार्गात फक्त फातोर्डातच स्टिल्ट होत आहेत, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
अनेक कामे राबविली
भू-गटारचे काम संपूर्ण फातोर्डात पूर्ण झालेले आहे. आम्ही उभारलेला ओपिनियन पोल स्क्वेअर हा लोकांना चालण्यासाठी तसेच विरंगुळय़ासाठी उपयुक्त ठरत आहे. पाचवा फिडर बसवून भूमिगत वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. जी कामे पहिल्यांदा आमदार झालो असता राहून गेली होती ती आमदाकीचा दुसरा कार्यकाळ संपेपर्यंत पूर्ण केली. यात फातोर्डात स्वतंत्र पोलीस स्थानक, पारपत्र कार्यालय, टपाल कार्यालय आणले. वाहतूक बेटांचे सुशोभिकरण तसेच वाहतूक सिग्नलसारखी कामे तर स्वखर्चाने केली. त्याखेरीज मिशन रॅबिजच्या अंतर्गत 7800 कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले, अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
आता कित्येक वर्षांपासून नियोजित असलेल्या बसस्थानकाचे काम मार्गी लावणे तसेच ओपिनियन पोल स्क्वेअरसारखी सुविधा बोर्डा येथे बोल्शे सर्कल ते चौगुले कॉलेज यादरम्यानच्या रस्त्यावर तयार करणे हे लक्ष्य आपण या कारकिर्दीत ठेवले असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.