विमानातून कोसळला मेन लँडिंग गियर टायर
वृत्तसंस्था /रोम
ऍटलस एअरच्या ड्रीमलिफ्टर, बोइंग 747 विमानाचा मेन लँडिंग गियर टायर टेक ऑफ करताच विमानापासून वेगळा झाला. ही दुर्घटना इटलीच्या टारंटो विमानतळावर घडली असून यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कार्गो विमानाने अमेरिकेच्या चार्ल्सटन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले आहे. दुर्घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. बोइंग 747 कार्गो विमानात 18 टायर असतात, याचमुळे विमानाला अन्य विमानतळावर सेफ लँडिंग करता आले आहे. तर विमानातून कोसळलेल्या टायरचे वजन सुमारे 100 किलो आहे. हा टायर विमानतळानजीकच्या एका द्राक्षबागेत मिळाला आहे. दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.