साडेचार लाखांचे नुकसान
वार्ताहर /हरमल
थोरलेबाग केरी येथील बापू धर्मा केरकर यांच्या घरावर वादळी वाऱयामुळे आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. घटनास्थळी मांदे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी अधिकाऱयांसह भेट देऊन पाहणी केली. सरकारकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. शिवाय आपणाकडून वैयक्तिक मदत देणार असल्याचे सांगितले.
तलाठी गौरेश गांवकर यांनी पंचनामा करून साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद केले. आमदार जित आरोलकर यांच्यासमवेत पेडणेचा अतिरिक्त ताबा असलेले उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, गटविकास अधिकारी मनेश केदार, तलाठी गांवकर, स्थानिक कार्यकर्ते अबलेश तळकर उपस्थित होते.
दरम्यान बापू केरकर यांनी आंब्याचा वृक्ष कोसळल्याने नुकसान झाले. तरीही घराच्या भोवती आणखी झाडे असल्याने त्यांच्यापासून मोठा धोका असल्याचे आमदार जित आरोलकर व ताबा असलेले उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांच्या निदर्शनास आणून दिले. आपत्कालीन स्थिती पाहून झाडे तोडण्याची परवानगी मिळू शकते व त्यासाठी सोपस्कार करण्याचे केरकर याना सांगितले. यावेळी त्या वाडय़ावरील नागरिकांनी आणखीन एका धोकादायक झाडाची पाहणी करण्याची विनंती केली व त्याचा अहवाल लागलीच सादर करण्याचे आदेश दिले.