प्रतिनिधी /बेळगाव
लाडका गणराया घरी येण्यासाठी अवघे काही दिवस उरले असल्याने आगमनाची लगबग सुरू झाली आहे. गणराया 11 दिवस घरी राहणार असल्याने त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. या सजावटीसाठी बेळगावची बाजारपेठ सजली आहे.
सजावटीची फुले, वेली, लटकन, तोरणे, माळांनी दुकाने बहरली आहेत. खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असून दोन वर्षांनंतर व्यापार वाढल्याने विपेत्यांच्या चेहऱयांवर समाधान दिसून येत आहे.
गणपती ज्या ठिकाणी विराजमान होतात, त्या ठिकाणी सजावट केली जाते. पूर्वी निसर्गातील साहित्याचा वापर करून सजावट केली जात होती. आता अनेक प्रकारांमध्ये सजावटीचे साहित्य बाजारात दाखल झाले आहे. फुले, माळा, चांदीचे वर्ख केलेले पाट, बस्कर, तोरण, लटकन, फोमपासून तयार करण्यात आलेले सजावटीचे साहित्य, विविध रंगीबेरंगी झिळमिळय़ा, चेंडू, फुगे, श्री गजानन प्रसन्न, बाप्पा मोरया अशा अक्षरांच्या पट्टय़ा, कृत्रिम फुलांचे फ्लॉवर पॉट, टिकली वर्क केलेले झगमगते पडदे, विद्युत माळा, लायटिंग फोकस, कृत्रिम फळे अशा एक ना अनेक सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सज्ज झाली आहे.
दरामध्ये झाली वाढ
यापूर्वी शोभिवंत वस्तू अधिकाधिक चिनी बनावटीच्या होत्या. परंतु मागील तीन-चार वर्षात चिनी बनावटीचे साहित्य पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत वस्तू सजावटीसाठी वापरल्या जात आहेत. यावषी जीएसटी व वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक साहित्याच्या किमतीला दरवाढीचा दणका बसला आहे. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी थोडे अधिकचे पैसे भाविकांना खर्च करावे लागणार आहेत.
गोक्यातील ग्राहकांची संख्या घटली
गणेशोत्सव सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी बेळगावमध्ये झुंबड उडते. दरवषी बेळगावसह चंदगड, कोल्हापूर, गोवा, कोकण येथूनही खरेदीसाठी ग्राहक येत असतात. गोव्याच्या ग्राहकांवर बेळगावच्या बाजारपेठेचे अर्थचक्र अवलंबून आहे. परंतु कोरोनापासून गोव्याच्या ग्राहकांची संख्या घटली. तसेच कर्नाटक वगळून इतर राज्यांच्या नंबरप्लेटची चार चाकी दिसताच पोलीस अडवणूक करून जबर दंड ठोठावत असल्यानेही परराज्यांतील खरेदीदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. गोव्याचे ग्राहक स्थानिक पातळीवर तसेच हुबळी येथे खरेदीला जात असल्याने याचा फटका बेळगावच्या बाजारपेठेला बसत आहे.
बेळगावमध्ये व्हरायटीचे साहित्य
बेळगावमध्ये स्वस्त व चांगल्या प्रतीचे सजावटीचे साहित्य मिळते. त्यामुळे मागील 15 ते 20 वर्षांपासून बांदा, ता. सावंतवाडी येथून खरेदीसाठी बेळगावमध्ये येतो. जवळपासच्या बाजारपेठांपेक्षा बेळगावमध्ये अनेक व्हरायटी मिळतात. लायटिंगच्या माळा, डेकोरेशनचे साहित्य, मखर, फटाके, पडदे यासह इतर साहित्य खरेदीसाठी कोकणातून मोठय़ा प्रमाणात नागरिक बेळगावमध्ये येत असल्याचे बांदा येथील ग्राहक उदय चिंदरकर यांनी सांगितले.