वृत्तसंस्था/ जेरुसालेम
येथे सुरू असलेल्या फिडेच्या विश्व सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय संघाला सोमवारचा दिवस संमिश्र ठरला. ब गटाच्या तिसऱया फेरीतील लढतीत भारताने अझरबेजानचा पराभव केला पण चौथ्या फेरीत उझ्बेकीस्तानने भारताला पराभूत केले.
तिसऱया फेरीतील लढतीत भारताने अझरबेजानवर 2.5-1.5 अशा गुणांनी मात केली. या लढतीत भारतीय संघातील विदीत संतोष गुजरातीने अझरबेजानच्या मॅमेडेरोव्हवर शानदार विजय मिळविला. तर या लढतीतील अन्य तीन पटावरील डाव बरोबरीत राहिले. निहाल सरीनने रेज्बोव्हला एस. एल. नारायणन गुसेनोव्हला आणि के. शशीकिरणने रौफ मॅमेडोव्हला बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीतील झालेल्या लढतीत उझ्बेकने भारताचा 3.5-0.5 असा पराभव केला. या लढतीतील एका पटावरील डावात उझ्बेकच्या येकूबेव्हने विदीत गुजरातीचा पराभव केला. उझ्बेकच्या सिनडेरोव्हने निहाल सरीनचा तसेच वॅकीडोव्हने अभिजित गुप्ताचा 51 व्या चालीत पराभव केला. या स्पर्धेतील अन्य एका लढतीत उझ्बेकने अमेरिकेवर 2.5-1.5 अशा गुणांनी मात केली. ब गटातून उझ्बेक संघाने उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या गटातील भारतासह अन्य पाच संघांना पुढील फेरीसाठी पात्र ठरण्याची निश्चितच संधी आहे.