आवारात पाण्याची डबकी, शौचालयांचा अभाव : प्रवाशांना सुविधा पुरविण्याची मागणी


प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने बसस्थानकाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तर काही ठिकाणी पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱया प्रवाशांची गैरसोय निर्माण होत आहे. अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, शौचालयांची अस्वच्छता, बसथांब्यांचा अभाव यामुळे बसस्थानकात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. यामुळे प्रवासीवर्गांचे हाल होत आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत मागील पाच वर्षांपासून बसस्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकात तात्पुरती बसस्थानकाची उभारणी करून बससेवा पुरविली जात आहे. मात्र या ठिकाणी सुविधांपेक्षा असुविधाच अधिक असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांना थांबण्यासाठी बसथांबे आणि छत उपलब्ध नसल्याने भर पावसात थांबावे लागत आहे. तर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ये-जा करताना प्रवाशांना कसरत करतच मार्गस्थ व्हावे लागत आहे. तसेच जागोजागी डबकी निर्माण झाल्याने प्रवाशांच्या अंगावर पाणी उडत आहे. परिवहनने लक्ष घालून सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होत आहे.
वयोवृद्धांची हेळसांड
मध्यवर्ती बसस्थानकात एका बाजूला स्थानिक बससाठी फलाट उभारला आहे. याठिकाणी स्थानिक लोकांना बससेवा पुरविली जात आहे. मात्र दुसरीकडे लांब पल्ल्याच्या बस आणि महाराष्ट्र-गोवा राज्याच्या बस एकाच ठिकाणी थांबविल्या जात आहेत. या ठिकाणी चिखल आणि डबकी निर्माण झाली आहेत. यातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांची हेळसांड होताना दिसत आहे.
बसस्थानकात शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील नसल्याने प्रवाशांना बाहेरील हॉटेलांचा आधार घ्यावा लागत आहे. परिवहनने बसस्थानकात प्राथमिक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
स्मार्ट बसस्थानक केव्हा?
2016 ला नवीन बसस्थानकाच्या कामाला प्रारंभ झाला. आज पाच वर्षांहून अधिक काळ उलटला तरी काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होणार, असा प्रश्न देखील प्रवाशांतून उपस्थित होत आहे.