भावी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
न्यायालयांमधील कामकाजांचे थेट प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक राष्ट्रीय प्राधीकरण स्थापन करण्याच्या विचारात असून प्रक्षेपणासाठी एकात्म मंचाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन भारताचे भावी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे एका सुनावणीच्या वेळी केले आहे.
न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासंदर्भात मॅथ्यूज नेदुमपारा यांनी ही याचिका सादर केली आहे. तिची सुनावणी न्या. चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर होत आहे. न्यायालयीन कामकाजाचे प्रक्षेपण केवळ सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय यांच्यापुरते मर्यादित राहणार नसून कनिष्ठ न्यायालयांच्या कामकाजाच्या प्रक्षेपणाचाही त्यात समावेश आहे. मात्र, त्यासाठी एक राष्ट्रीय मंच स्थापन करण्याची आवश्यकता आहे. असा मंच स्थापन करण्यासाठी ऑन लाईन तंत्रज्ञान जाणणारे तज्ञ, विधीज्ञ आणि इतर तज्ञांची आवश्यकता लागणार आहे. त्याची जमवाजमव सध्या सुरु आहे. आम्हाला एकात्म राष्ट्रीय यंत्रणेची आवश्यकता आहे, असे न्या. चंद्रचूड यांनी निदर्शनास आणून दिले.
अनेक राज्यांमध्ये प्रक्षेपण
न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचे नियम आणि अटी तयार करण्यात आल्या आहेत. मध्यप्रदेश, ओडिशा, गुजरात, कर्नाटक आणि बिहार आदी राज्यांमध्ये यापूर्वीच अशा प्रक्षेपणास प्रारंभ करण्यात आलेला आहे. अनेक उच्च न्यायालयांनी या नियमांचे पालन करण्यासही प्रारंभ केला आहे. मात्र, सर्वच न्यायालयांमध्ये हे प्रक्षेपण होण्यासाठी राष्ट्रीय मंच स्थापन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन न्या. चंद्रचूड यांनी या सुनावणीत केले.