ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. मतदानाचा हा दिवस भाजप आणि मविआच्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजला. आता या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि मविआचे काँग्रसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे उमेदवार मतदानाला आले तेव्हा त्यांनी कमळ हे चिन्ह असलेलं उपरणं घातलं होतं. हे उपरणं घालूनच त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेत रासने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत सपत्नीक कसबा गणपतीसमोर उपोषण केलं होते. याप्रकरणी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : ‘अग्निपथ’ योजनेविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या