सलामीवीर स्मृती मानधनाचे नाबाद अर्धशतक, यजमान इंग्लंड संघाला 8 गडी राखून हरवले
डर्बी / वृत्तसंस्था
सलामीवीर स्मृती मानधनाने तडफदार नाबाद अर्धशतक झळकावल्यानंतर भारतीय महिला संघाने इंग्लिश संघाला दुसऱया टी-20 सामन्यात 8 गडी राखून मात दिली आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यजमान इंग्लिश संघाने 20 षटकात 6 बाद 142 धावा केल्या तर प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने 16.4 षटकात 2 बाद 146 धावांसह सहज विजय संपादन केला. स्मृती मानधनाला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
मालिकेतील या दुसऱया लढतीत इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे स्पष्ट झाले. भारतीय महिला गोलंदाजांनी नियंत्रित टप्प्यावर, बिनचूक मारा करत इंग्लंडला पहिल्या 10 षटकातच 5 बाद 54 अशी रोखून धरले. पहिल्या काही षटकात इंग्लंडवर सातत्याने दडपण राहिले. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद होत राहिल्याने त्यांची धावसरासरी बरीच कमी राहिली. प्रेया केम्प (37 चेंडूत नाबाद 51) व बॉशियर (26 चेंडूत 34) यांनी सहाव्या गडय़ासाठी 65 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
एकीकडे, 17 वर्षीय केम्पने 3 चौकार व 3 षटकार फटकावत संघाला शतकाचा टप्पा पार करुन दिला तर दुसरीकडे बॉशियरच्या संयमी खेळीत 3 चौकारांचा समावेश राहिला. मात्र, स्नेह राणाने 18 व्या षटकात बॉशियरला रिचा घोषकरवी यष्टीचीत करत ही जोडी फोडली. केम्पने त्यानंतरही फटकेबाजीवर भर दिला आणि सोफी इक्लेस्टोनच्या साथीने शेवटच्या 15 चेंडूत 23 धावांची भागीदारी नोंदवली. यासह इंग्लंडने 6 बाद 142 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय महिला संघातर्फे राणाने 4 षटकांचा कोटा पूर्ण करत 24 धावात 3 बळी घेतले. रेणुका सिंग (1-30), दीप्ती शर्मा (1-21) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
स्मृती-शफालीची उत्तम सलामी
प्रत्युत्तरात स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी पहिल्या 6 षटकात 55 धावांची सलामी दिली. इक्लेस्टोनने शफालीला 20 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. इक्लेस्टोनने आपल्याच गोलंदाजीवर उजवीकडे झेपावत तिचा उत्तम झेल टिपला. दयालन हेमलता (9) पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. तिला पेया डेव्हिसने तंबूचा रस्ता दाखवला. नंतर स्मृतीच्या साथीला कर्णधार हरमनप्रीत कौर (22 चेंडूत नाबाद 29) क्रीझवर उतरली आणि या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 69 धावांची अभेद्य भागीदारी साकारत संघाला 16.4 षटकात 2 बाद 146 धावांसह विजय संपादन करुन दिला.
मानधनाने डेव्हिसच्या 17 व्या षटकात फटकावलेले 3 चौकार लक्षवेधी ठरले. तिने बॅकवर्ड कव्हर्सकडे पहिला, मिडविकेटकडे दुसरा व लाँगऑनकडे तिसरा चौकार फटकावला. आश्चर्य म्हणजे भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीत एकही षटकार समाविष्ट नव्हता. पण, तरीही त्यांनी चौकारांची लयलूट केली. फक्त स्मृतीनेच 13 चौकार फटकावले तर हरमनप्रीत व शफाली यांनी प्रत्येकी 4 चौकार नोंदवले. यजमान संघातर्फे एकाही गोलंदाजाला अपेक्षित यश लाभले नाही. इक्लेस्टोन (1-22) व डेव्हिस (1-30) यांनाच प्रत्येकी 1 गडी बाद करता आला. 3 सामन्यांच्या या मालिकेत तूर्तास 1-1 अशी बरोबरी असून तिसरा व शेवटचा सामना आज (गुरुवार दि. 15) ब्रिस्टॉल येथे खेळवला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लिश महिला संघ ः 20 षटकात 6 बाद 142 (प्रेया केम्प 37 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 51, मईया बॉशियर 26 चेंडूत 4 चौकारांसह 34, ऍमी जोन्स 17, ब्राऊनी स्मिथ 16. अवांतर 2. स्नेह राणा 4 षटकात 3-24, दीप्ती शर्मा, रेणुका सिंग प्रत्येकी 1 बळी).
भारतीय महिला संघ ः 16.4 षटकात 2 बाद 146 (स्मृती मानधना 53 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 79, हरमनप्रीत कौर 22 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 29, शफाली वर्मा 17 चेंडूत 4 चौकारांसह 20. अवांतर 9. प्रेया डेव्हिस, सोफी इक्लेस्टोन प्रत्येकी 1 बळी).
ब्लर्ब
उभय संघातील तिसरी लढत आज ब्रिस्टॉल येथे खेळवली जाईल.