मंत्री सुभाष शिरोडकरांनी मांडला विकासाचा रोडमॅप
प्रतिनिधी /शिरोडा
प्रत्येक कुटुंबापर्यंत पायाभूत सुविधा, सेवा व सुशासन हा भाजपा सरकारचा नारा आहे. सबका साथ, सबका विकास हाच ध्यास घेऊन सरकार स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. शिरोडा मतदार संघात शिक्षण व रोजगार असा विकासाचा समांतर पूल उभारुन पुढील पाच वर्षे स्वयंपूर्ण शिरोडाचे धोरण आखले असून याच मार्गातून सध्या सुनियोजीतपणे वाटचाल सुरु केली आहे.
प्रश्न : पायाभूत सुविधांबाबत शिरोडा आज कुठे आहे ?
शिरोडा मतदार संघ हा पायाभूत सुविधांमध्ये स्वयंपूर्णतेकडे पोचत आहे. हा भाग क्षेत्रफळाने मोठा असून ग्रामीण भागात वसलेला आहे. येथील प्रत्येक घरापर्यंत रस्ते पोचले असून काही ठिकाणी जमिनीचे वाद व अन्य कारणांनी रस्त्यांचे काम अडले आहे. काही मोजकीच घरे सोडल्यास घरोघरी नळ जोडणी झालेली आहे. एखादेच घर सोडल्यास वीज जोडणीही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचली आहे. माणसाच्या प्राथमिक गरजा असलेल्या या सुविधांच्या दृष्टीने शिरोडा मतदार संघ स्वयंपूर्ण होताना दिसतो. तसेच निवाऱयाचा विचार केल्यास शिरोडय़ातील साधारण चारशे कुटुंबांचे अटल आसरा अर्ज मंजूर झाले असून अजून पाचशे नागरिकांना इतर मागास वर्गीय, अटल आसरा किंवा अन्य योजनांखाली या वर्ष अखेरपर्यंत सरकारतर्फे साहाय्य केले जाईल.
कृषी क्षेत्राच्या समृद्धीसाठी कोणता विचार आहे ?
मुळातच शिरोडा मतदार संघ हा कृषी प्रधान भाग म्हणून ओळखला जातो. या भागात किमान तीन हजार कुटुंबांकडे पाचशे ते पाच हजार व दहा हजार चौ. मिटरपर्यंत जमिन आहे. अशा शेतकरी कुटुंबांना कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देतानाच तरुणांना शेतीकडे वळवून बेरोजगारी कमी करता येईल. त्यादृष्टीने सरकारच्या विविध कृषी विषयक योजना व सवलती देऊन त्यांना कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याशिवाय इतर घटकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिरोडा मतदार संघात औद्योगिक क्षेत्राला चालना दिली जाणार आहे. शिरोडा व पंचवाडी येथे औद्योगिक वसाहतींचा पाया घालण्यात आलेला आहे. याठिकाणी चांगला रोजगार देऊ शकणारी औद्योगिक आस्थापने आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
शिरोडय़ात शैक्षणिक सुविधा बऱयापैकी आहेत, त्याला पुरक रोजगार कसा निर्माण करणार ?
शिरोडा मतदार संघ शिक्षणाचे हब म्हणून पुढे येत आहे. त्यादृष्टीने शिक्षण व त्याला पुरक रोजगार या संकल्पनेवर आमचे काम सुरु आहे. नुकत्याच लागलेल्या शालांत परीक्षेच्या निकालात शिरोडा मतदार संघातून साधारण 260 विद्यार्थी विशेष श्रेणी व प्रथम वर्ग मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राकडे वळावे यासाठी आपण विशेष कार्यक्रम आखला आहे. सध्याचा व येणारा काळ हा विज्ञान व तंत्रज्ञानाचा आहे. विद्यार्थी व पालकांचा त्याकडे कल वाढावा यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शालेय स्तरावच मुलांमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी असे उपक्रम शाळांमधून सुरु केले आहेत. दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आयटी, मॅकनिकल, इलेक्ट्रोनिक्स व संगणक या शाखांची निवड केल्यास पुढील पाच ते दहा वर्षांत येथील युवक बेरोजगार राहणार नाही. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आटीआय व डिप्लोमाकडे वळवून औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातील. केंद्र सरकारच्या स्कील इंडिया, स्टार्ट अप व मेक इन इंडिया या योजना शिरोडय़ात यशस्वीपणे राबविण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी तांत्रिक शिक्षण व रोजगार अशा दोन पातळय़ांवर विशेष भर दिला जाणार आहे.
कचऱयाच्या समस्येवर कशी मात करणार ?
शिरोडा मतदार संघातील आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व कचरा व्यवस्थापन हा विषय हाताळताना स्थानिक ग्रामपंचायतीवर मोठी जबाबदारी आहे. केंद्राकडून उपलब्ध होणारा चौदावा व पंधरावा वित्त आयोगाचा भरघोस निधी प्रत्येक पंचायतींने कचरा व्यवस्थापनावर योग्यप्रकारे खर्च केला पाहिजे. कचरा हा विषय तसा संवेदनशिल आहे. प्रत्येक नागरिकाला त्यासाठी जबाबदारीने वागावे लागेल. घरोघरी कचरा गोळा करण्याची यंत्रणा राबवितानाच बोरी सारख्या भागात इतर ठिकाणाहून कचरा फेकण्याच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना व सामाजिक संस्थांना अधिक दक्ष व्हावे लागेल.
बोरी भागातील वाहतुकीच्या जटील समस्येवर तोडगा कधी निघणार ?
बोरी भागातील वाहतूक समस्या ही महामार्गांशी संबंधीत आहे. फोंडा – मडगाव महामार्ग हा बोरीतून जातो. दक्षीण व उत्तर गोव्यातील दळणवळणाच्या दृष्टीने हा सोयिस्कर मार्ग असल्याने अवजड वाहनांची रहदारी बेसुमार वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून देऊळवाडा ते बोरीपुलापर्यंत रस्ता रुंदीकरण तसेच नवीन पूल व बगलरसत्याचा पाठपुरावा सुरु आहे. त्यासाठी रु. 450 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर येत्या 2 ते 3 वर्षांत नवीन पूल व बगलरस्त्याचे काम मार्गी लागेल.
रोजगारीच्या दृष्टीने बोरी येथील सिद्धनाथ पर्वत, पंचवडीचे म्हैसाळ धरण तसेच कोडार कृषी फार्मचा पर्यटनीय विकास व ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढील वर्षभरात ठोस योजना आखली जाईल. येत्या पाच वर्षांत शिरोडा मतदार संघात रोजगार, सर्वांना चांगले आरोग्य व समृद्धी हे आपले ध्येय आहे.