वार्ताहर /दाभाळ
कण्णेव्हाळ बेतोडा येथे बोरी कुर्टी बगल रस्त्याला लागून असलेली शेत जमिनी मातीचा भराव टाकून बुजविण्यात आली असून जमीन मालकाकडून ट्रक पार्किंगसाठी या जागेचा बेकायदेशीर वापर सुरु आहे. बेतोडा पंचायतीला याची माहिती असूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. मागील काही महिन्यापासून हा बेकायदेशीर प्रकार याठिकाणी सुरु असून नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे संबंधित जमीन मालकांनी याठिकाणी कचरा टाकू नये तसेच वाहने पार्क करू नयेत व तसे केल्यास कारवाई करण्यात येईल, असा फलक लावलेला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या पारंपारिक शेत जमिनीत पूर्वी भाताचे पिक घेतले जायचे. काही वर्षांपासून शेती करणे बंद झाल्याने ही जमीन पडिक बनून राहिली होती. रस्त्याला लागून मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या मोकळ्या शेत जमिनीवर काही लोकांचा डोळा होता. चार वर्षांपूर्वी वंसत सावंत नामक व्यक्तीने ही शेतजमीन विकत घेतली व मातीचा भराव टाकून ती बुजवून टाकली. दोन वर्षांपूर्वी फोंड्याच्या मामलेदारांकडून या प्रकाराविरोधात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर काही काळ भराव टाकण्याचे काम बंद झाले होते. मात्र तीन चार महिन्यापासून जमीन मालकाने नवीन शक्कल लढवित परराज्यातील अवजड वाहनांसाठी या शेतजमीनीत वाहनतळ तयार केला आहे. मालवाहू ट्रक व अन्य अवजड वाहनचालकांकडून पैसे आकारून याठिकाणी पार्किंगसाठी जागा दिली जाते. बेतोडा निरंकाल मुख्य रस्त्याला लागूनच हा वाहनतळ तयार करण्यात आला असून पार्किंगसाठी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पंचायत व संबंधित सरकारी यंत्रणाने या बेकायदेशीर वाहनतळावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.