2 रुपये दराने खरेदी करतोय गहू ः व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/ होशियारपूर
पंजाबमध्ये गरीबांना रास्त दरात धान्य पुरविण्यात येत आहे, परंतु या धान्यासाठीच्या रांगेत अनेक श्रीमंत देखील उभे आहेत. अशाचप्रकारचे चित्र पंजाबमध्ये दिसून आले आहे. तेथे एक व्यक्ती मर्सिडीज कारमधून उतरला आणि गरीबांसाठीचे 2 रुपये किलो दराने असणारा गहू घेऊन गेला.
मर्सिडीजमधून आलेल्या व्यक्तीला पाहून अन्य लोक थक्कच झाले. मर्सिडीज सारख्या आलिशान कारचा मालक गरीब कसा असू शकतो असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर बीपीएल कार्ड शासनाचा विभाग प्रदान करत असल्याने आपण यात काहीच करू शकत नाही असे रेशन दुकानदाराने म्हटले आहे. यादरम्यान मर्सिडीजमधील गरीबाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
मर्सिडीजमधून आलेला हा व्यक्ती बीपीएल कार्डसह दोन रुपये किलोदराने मिळणारा गहू प्राप्त करण्यासाठी रेशन दुकानात पोहोचला होता. मर्सिडीजमधून गहू आणण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तीला पाहून लोकांना धक्काच बसला. या व्यक्तीने बीपीएल कार्ड दाखविल्यावर रेशन दुकानदारही चकित झाला. त्याच्याकडे बीपीएल कार्ड असल्याने त्याला धान्य देण्यास नकार देणे शक्य नव्हते.
काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करत तो व्हायरल केला आहे. याप्रकरणी पंजाबचे अन्नपुरवठा मंत्री लालचंद कटारुचक्क यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.