गवळी बांधवांचा सहभाग : पाडव्यानिमित्त सर्वजण एकत्र : दुचाकीसोबत म्हशी पळविण्याचा थरार
प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसरात बुधवारी पाडव्यानिमित्त सजविलेल्या म्हशींची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दरवषीप्रमाणे गवळी बांधव म्हशींना सजवून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटानंतर यंदा झालेल्या म्हशींच्या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये पाडव्यादिवशी म्हशींना सजवून पळविले जाते. दुभत्या जनावरांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरात या मिरवणुकीचे आयोजन केले जाते. शहरातील गवळी गल्ली, गोंधळी गल्ली, कॅम्प परिसर, चव्हाट गल्ली, नानावाडी, कोनवाळ गल्ली, वडगाव आदी भागांमध्ये सजविलेल्या म्हशींची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी म्हशींच्या शिगांना रंग, रिबन, मोरपिसे बांधण्यात आली. गळय़ात साखळय़ा, पायात गोंडे बांधून गवळी बांधव म्हशींना घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या म्हशी आकर्षण ठरत होत्या. कोरोनामुळे मागील दोन वर्षात सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे यंदा सालाबादप्रमाणे शहरात म्हशींची मिरवणूकही उत्साहात काढण्यात आली.
ठिकठिकाणी म्हशींना सजवून पळविण्यात आले. त्याचबरोबर दुचाकी पाठीमागून म्हशी पळविण्याचा थरारही पाहायला मिळाला. बुधवारी सकाळी म्हशींचे पूजन करून त्यांना गल्लोगल्ली फिरविण्यात आले. मिरवणुकीत धावणाऱया म्हशी आकर्षण ठरत होत्या. तब्बल दोन वर्षांनंतर म्हशींची मिरवणूक काढण्यात गवळी बांधवांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
कपिलेश्वर मंदिरात गोवर्धन पूजा
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दरवषीप्रमाणे पाडव्याचे औचित्य साधून गोवर्धन पूजा करण्यात आली. गो-मातेवरील लम्पीचे संकट लवकर दूर होऊ दे, असे साकडे घालण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, दौलत जाधव, सचिन आनंदाचे यासह ट्रस्टी व सेवेकरी उपस्थित होते.
ग्रामीण भागातही म्हशींची मिरवणूक
ग्रामीण भागातही पाडव्यानिमित्त म्हशींना सजवून मिरवणूक काढण्यात आली. दरवषीप्रमाणे म्हशींना सजवून शेतकरी मिरवणुकीत सहभागी झाले होते. उचगाव, बेनकनहळ्ळी, जाफरवाडी आदी गावांतून म्हशींची मिरवणूक काढण्यात आली. शिंगांना रंग, रिबन, गळय़ात घंटा व पायात साखळय़ा बांधून मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर काही ठिकाणी दुचाकी पाठीमागून म्हशी पळविण्याचा थरारदेखील पाहायला मिळाला.