वार्ताहर /माशेल
जुने गोवा येथील जगप्रसिद्ध सेंट फान्सिस झेवियर यांचे फेस्त आज 3 डिसे. रोजी चर्च परिसरात साजरे होत आहे. यावेळी उपस्थित राहण्यासाठी शेजारील राज्य कर्नाटक, महाराष्ट्रातून शेकडो भाविक पायपीट करत हजर राहण्यासाठी पोचले आहेत.
पदयात्रेत 65 भाविक खानापूर, संघरगारी, बेळगावीहून अंदाजे 120-30 कि.मी. चालत गुरूवारी रात्री माशेल येथील चर्च जवळ पोचली. तिथे माजी सरपंच तथा विद्यमान पंच फान्सिस लोबो यांनी त्यांचे स्वागत करून त्याच्या रात्रीच्या मुक्कामाची व जेवणाची तसेच सकाळी नाश्त्याची व्यवस्था केली.
यावेळी फादर व्हीनोटो आणि फादर कुस्तासलिंबा म्हणाले की गेल्या तीस वर्षापासून खानापूर व संघरगावी बेळगावी येथील भाविकांनी हा उपक्रम चालू केला असून चार ते पाच दिवस ते पायी चालत जुने गोव्याला येतात. तेथील नोव्हेनात सहभागी होत फेस्त साजरे केल्यानंतर सायंकाळी परतीच्या वाटेवर जातात.
भाविकांनी 29 नोव्हे. रोजी पदयात्रा सुरू केली होती. जुने-गोवा येथे 2 डिसें. रोजी पोचली. सुरवातीला तळेगाव, कृष्णापूर, सोनालीनंतर वाळपई व माशेल येथे गुरूवारी रात्री मुक्काम झाल्यावर 2 रोजी जुने गोवा येथे पोचली.