चिरे काढण्याच्या यंत्रासह चौघे ताब्यात
प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यातील थातोडी धारबांदोडा येथे सोमवारी सायंकाळी खाण खात्याचे अधिकारी व कुळे पोलिसांनी चिरेखाणीवर धाड घालून 1 जेसीबी, 2 कटींग मशीन व 5 पॉवर टिलर यंत्रे जप्त केली आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संजय दळवी यानी दिलेल्या माहितीनुसार थातोडी धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक 113/1 मध्ये बेकायदेशीरपणे चिरे काढण्याचा धंदा सुरु होता. याची माहिती मिळताच खाणीवर संयुक्तपणे धाड टाकून चिरे काढण्याच्या सामग्रीसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात गणपत गावकर, मुकेश उराव, राजेश किंडो व संतोष लमाणी यांचा समावेश आहे.
खाण खात्याचे अधिकारी ओंकार नाईक गावकर यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वरील कारवाई करून दुसऱया दिवशी पंचनामा करण्यात आला. मंगळवारी सर्व संशयितांना जामिनासाठी न्यायालयात उभे करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अजय धुरी करीत आहे.