ऍमेझॉन, ऍपल, गुगल यासारख्या कंपन्यांचा समावेश : मेटाकडून इंजिनिअर भरतीत 30 टक्क्यांनी कपात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या संकटातून काहीसे सावरणे सुरु असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचे ढग निर्माण होत आहेत. याचा नकारात्मक परिणाम म्हणून जगातील प्रमुख आयटी कंपन्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या कंपन्या या मागील पाच ते सहा महिन्यांपासून पूर्णपणे संकटातून प्रवास करत असल्याची माहिती आहे.
याचदरम्यान दिग्गज कंपन्यांमध्ये गुगल, ऍमेझॉन, ऍपल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्ला यांच्यासह टेक क्षेत्रातील प्रमुख कंपन्या मंदीचा सामना सहन करत असून यामधून सावरण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. आपली आर्थिक घडी विस्कटून जाऊ नये म्हणून या कंपन्यांनी कर्मचाऱयांची कपात करणार असल्याची माहिती आहे. आज आपण जाणून घेऊया या प्रमुख कंपन्यांविषयी..
अल्फाबेट/गुगल : गुगल कंपनीची सहयोगी कंपनी अल्फाबेट भरती प्रक्रियेत उमेदवारांची भरती कमीच करणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी एक इंटरनल मेमो काढून कर्मचाऱयांना या संदर्भात माहिती दिली आहे. दुसऱया तिमाहीमध्ये गुगलने भले 10 हजार लोकांची भरती केली आहे. परंतु यामध्ये चालू वर्षात ही भरती प्रक्रिया संथपणे सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऍमेझॉन : ऍमेझॉन जगात सर्वाधिक रोजगार देणाऱया कंपन्यांपैकी एक आहे. यामध्ये मार्च 2022 पर्यंत ऍमेझॉनसोबत 16 लाख कर्मचारी जोडले आहेत. कंपनीने चालू वर्षात एप्रिलमध्ये सांगितले आहे, की त्यांच्याजवळ अधिकचे कर्मचारी आहेत. यामध्ये कोरोना काळात रजेवर गेलेले कर्मचारी आता पुन्हा कामावर रुजू होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे काही दिवसच स्टाफची कमतरता होती, ती भरुन निघाली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ऍपल : ऍपलने आतापर्यंत मंदी संदर्भात कार्यालयाकडून कोणतीही माहिती दिलेली नाही. यात ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार या प्रकरणाशी संबंधीत असणाऱया घटकांनुसार कंपनी आर्थिक संकटातून प्रवास करत असल्याने भरती कमी केली असून काही प्रमाणात खर्चात कपात करण्यावर योजना आखली जात असल्याची माहिती ऍपलने दिली आहे.
फेसबुक : फेसबुकची सहयोगी कंपनी मेटाने इंजिनिअर भरतीत 30 टक्क्यांनी कपात केली आहे. यामध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मार्च महिन्यापर्यंत सोशल मीडिया व इंटरनेट कंपनीसोबत जवळपास 78 हजार लोकांना कमी करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मायक्रोसॉफ्ट : मायक्रोसॉफ्टने मे मध्ये कर्मचाऱयांना दिलेल्या माहितीनुसार विंडोज, ऑफिस आणि टीम ग्रुप्समध्ये भरतीत कपात करणार आहे. यासह कंपनीने काहींची कपातही केली आहे. यामुळे कामाचा ताण 1 टक्क्यांनी कमी राहणार असल्याची माहिती आहे.
नेटफ्लिक्स : व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी नेटफ्लिक्सने काही राउंडमध्ये कपात केली आहे. तर नेटफ्लिक्सने सर्वात पहिल्यांदा मे मध्ये 150 लोकांना नोकरीवरुन कमी केले आहे. यानंतर जूनमध्ये कंपनीने पुन्हा 300 कर्मचारी कर्मचाऱयांना कमी केले आहे.
टेस्ला : जगातील दुसऱया नंबरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने जूनमध्ये कॅलिफोर्नियाच्या सॅन माटिओची एक सेवा बंद करण्यात आल्यानंतर ऑटोपायलट डिपार्टमेंटच्या 200 जणांना कमी केले आहे. यावरुन मस्क यांनी मंदी निर्माण होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती.