ईडीकडून कारवाई ः विदेशात जाण्यापासून मज्जाव
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या नातेवाईक मेनका गंभीर यांना ईडीने कोलकाता विमानतळावर विदेशात जाण्यापासून रोखले आहे. मेनका गंभीर यांना मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात चौकशीत सामील होण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. शनिवारी रात्री बँकॉकसाठी रवाना होण्याकरता गंभीर या विमानतळावर पोहोचल्या होत्या. ईडीकडून जारी लुकआउट सर्क्युलरच्या आधारावर विदेशात जाण्याची मंजुरी देण्यास नकार देण्यात आला आहे.
ईडीच्या अधिकाऱयांनी मेनका गंभीर यांना सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याकरता समन्स सोपविला आहे. मनी लॉन्ड्रिंगशी निगडित हे प्रकरण पश्चिम बंगालमधील कोळसा चोरीशी संबधित आहे. ईडीने अद्याप गंभीर यांची याप्रकरणी चौकशी केलेली नाही. परंतु सीबीआयने यापूर्वी त्यांची चौकशी केली होती. ईडीने यापूर्वी याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे तसेच तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुचिरा यांची चौकशी केली होती.