भारत – ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना ः राहुल – जडेजावर सारे लक्ष, कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन
वृत्तसंस्था / विशाखापट्टणम
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज रविवारी विशाखापट्टणम येथे होणार असून पुन्हा एकदा सारे लक्ष के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर केंद्रीत होणार आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा मुंबईतील सलामीचा सामना गमावल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतणार आहे.
वानखेडे स्टेडियमवरील कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला होता. बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेदरम्यान फॉर्म गवसण्यासाठी संघर्ष कराव्या राहुलला तिसऱया आणि चौथ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. मात्र पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद 75 धावांची संयमी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि त्यानंतरच्या शस्त्रक्रियेमुळे सुमारे आठ महिन्यांनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱया जडेजानेही शुक्रवारी 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नाबाद 45 धावा केल्या तसेच 46 धावांत 2 गडी टिपले.
या वर्षाच्या अखेरीस भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार असून त्याचा विचार करता फॉर्ममध्ये असलेला राहुल आणि पूर्णपणे तंदुरुस्त जडेजा हे भारताची बाजू भक्कम बनवून जातील आणि सध्या चालू असलेली तीन सामन्यांची मालिका निवड समितीला या दोघांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यास मदत करेल. भारत आजच्या सामन्यातून या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा आणि फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल.


रोहित शर्माचे पुनरागमन होणार असल्याने ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा वेग आणि विविधता यासमोर गडबडलेल्या वरच्या फळीला निश्चितच मजबुती मिळेल. भारतीय फलंदाज दर्जेदार डावखुऱया वेगवान गोलंदाजांसमोर गडबडताना दिसलेले असून उर्वरित दोन सामन्यांमध्ये स्टार्कचा सामना करणे हे त्यांना विश्वचषक स्पर्धेचा विचार करता घरच्या परिस्थितीत चांगला सराव देऊन जाईल. रोहित शर्मा सलामीला येणार असल्याने मुंबईत 3 धावंवर बाद झालेल्या इशान किशनला बाहेर बसावे लागेल.
पहिल्या सामन्यात कोहली आणि गिलही स्वस्तात बाद झालेले असले, तरी त्याहून जास्त चिंताजनक सूर्यकुमार यादवला फॉर्म न गवसणे हे आहे. ‘टी20’मध्ये बाजी मारणाऱया सूर्यकुमारला अजूनही एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर गवसलेला नाही. या वर्षातील पाच एकदिवसीय सामन्यांसह मागील 15 एकदिवसीय सामन्यांत (13 डाव) त्याला अर्धशतक नोंदवता आलेले नाही. तथापि, श्रेयस अय्यरचे पुनरागमन कधी होईल हे निश्चित नसल्याने भारत चौथ्या क्रमंकासाठी सूर्यकुमारलाच प्राधान्य देत राहण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी वानखेडेच्या खेळपट्टीवर जबरदस्त कामगिरी केली. पण फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला दमदार छाप पाडता आली नाही. तथापि, संघ व्यवस्थापनाकडून गोलंदाजीत फेरफार केला जाण्याची शक्यता कमीच आहे. मुंबईत पांडय़ाने तिसऱया मध्यमगती गोलंदाजाची भूमिका बजावली. दुसऱया एकदिवसीय सामन्यासाठीच्या हवामानाचा अंदाज किमान पूर्वार्धात काही प्रमाणात पावसाळी वातावरण असू शकते असे सांगतो. याचा अर्थ असा की, तशा स्थितीत दोन्ही बाजूचे वेगवान गोलंदाज चेंडू स्विंग करू शकतील.
ऑस्ट्रेलिया शुक्रवारी मिशेल मार्श, कॅमेरून ग्रीन, मार्कस स्टॉइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल अशा चार अष्टपैलू खेळाडूंसह उतरला. तरीही ते भारताला जास्त त्रास देऊ शकले नाहीत. कर्णधार स्टीव्ह स्मिथसाठी हा चिंतेचा विषय असेल. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत एक तात्पुरता सलामीवीर म्हणून मार्शने 65 चेंडूंत 81 धावा काढून चांगली सुरुवात केली. परंतु मधल्या षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला आणि 2 बाद 129 वरून 188 धावांवर त्यांचा डाव संपला. सखोल फलंदाजी असूनही त्यांनी अवघ्या 19 धावांत सहा फलंदाज गमावले. यावर त्यांना काम करावे लागेल.
स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना कसोटी मालिकेत कठीण खेळपट्टय़ांचा सामना करावा लागला. परंतु भारतातील एकदिवसीय सामन्यांसाठीच्या खेळपट्टय़ा या सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल असतात आणि त्यामुळे या दोन्ही प्रमुख फलंदाजांकडून ऑस्ट्रेलियाला अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. भारत दौऱयात स्मिथने आतापर्यंत 50 धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार हा धावांचा दुष्काळ संपवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. मुंबईत ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी कमालीची भेदक दिसली. त्यांच्या सीन ऍबॉटने भारतीय फलंदाजांना अचूक गोलंदाजी करून बांधून ठेवले आणि ग्रीन, स्टॉइनिस यांनीही चांगला हातभार लावला.
संघ-भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपलब्ध नाही), सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.
ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर, ट्रव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, मार्कस स्टॉइनिस, ऍलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, शॉन ऍबॉट, ऍश्टन आगर, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा.