पुणे : जगभरात ‘काेविशिल्ड’ या काेराेना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांच्या माेबाईल नंबरवरुन बनावट व्हाटसॲप मेसेज पाठवून विविध खात्यात पैसे पाठविण्यास सांगून तब्बल एक काेटी एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पाेलीस ठाण्यात आयपीसी ४११९, ४२०, ३४ सह आयटी ॲक्ट ६६ सी व डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सीरम इन्स्टिटयूट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पाेलीस ठाण्यात आराेपींविराेधात फिर्याद दाखल केली आहे. हा सर्व फसवणुकीचा प्रकार सात व आठ सप्टेंबर याकालावधीत ऑनलाईन पध्दतीने घडला. सीरम कंपनीचे सीईओ पदावर आदर पूनावाला काम करत असून, कंपनीच्या संचालक पदावर सतीश देशपांडे हे काम करत आहेत. देशपांडे यांच्या माेबाईलवर आदर पूनावाला यांच्या माेबाईल क्रमांकावरुन व्हाटसॲप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काही बँक खात्यांचे नंबर देण्यात आले हाेते. तसेच या नंबरवर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगण्यात आले हाेते.
अधिक वाचा : पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे पुण्यातील विसर्जन मिरवणूक लांबली, २७ तासानंतरही मिरवणूक सुरूच
कंपनीचे मालकांचा मेसेज आल्याने व त्यांनी तातडीने पैसे भरण्यास सांगितल्याने देशपांडे यांनी याबाबतची माहिती कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांना दिली. त्यानुसार कित्तुर यांनी बनावट मेसेजद्वारे आलेल्या विविध बँक खात्यावर एक काेटी एक लाख एक हजार रुपये भरले. मात्र, त्यानंतर याबाबत कित्तुर यांनी कंपनीत चर्चा केल्यानंतर, आदर पुनावाला यांनी अशाप्रकारे विविध बँक खात्यावर पैसे भरण्यास काेणत्याही मेसेज केलेला नव्हता ही बाब उघडकीस आली. त्यामुळे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे कंपनीच्या लक्षात येताच याबाबत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे ठरेल. त्यानुसार कित्तुुर यांनी याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. बंडगार्डन पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.