रायगड प्रतिनिधी
श्रीवर्धन (जि रायगड) शहरातील जीवनाबंदर जेट्टी जवळ एक नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याने या नौकेमध्ये झोपलेल्या एका खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना १४ एप्रिलच्या मध्यरात्री घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अतिक हबीबुल्ला खलीफे वय ४७ रा. श्रीवर्धन यांच्या मालकीची मासेमारी नौका श्रीवर्धन येथील जीवनाबंदर जेट्टीच्या जवळ नांगरून ठेवलेली होती. अचानक ही नौका पाण्यात बुडाल्याची घटना घडली . या नौकेमध्ये कर्नाटक का तील मूळ रहिवासी असलेला हनुमंत थांगुड गौद्रा हा दारूच्या नशेत झोपलेला होता. समुद्रातील आलेल्या एका लाटेमुळे नौकेला जलसमाधी मिळाली, त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत या नौकेचे मालक अतिक हबीबुल्ला खलिफे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार विनोद गायकवाड यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवालदार विनोद गायकवाड अधिक तपास करत आहेत.