Tarun Bharat

हॅलोविन फेस्टिव्हलदरम्यान दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी

सुमारे 50 जणांना हृदयविकाराचा झटका ः शेकडो जखमी

सेऊल / वृत्तसंस्था

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये हॅलोविन फेस्टिव्हलदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सुमारे 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज आहे. चेंगराचेंगरीत चिरडून काही जणांना जीवही गमवावा लागल्याची भीती व्यक्त होत आहे. तथापि, अधिकृत मृतांची संख्या तात्काळ जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॅलोविन फेस्टिव्हलमध्ये गर्दी होत असताना ही घटना घडली. शेकडो लोक एका अरुंद गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेनंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी एक निवेदन जारी करून लोकांवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हॅलोविन फेस्टिव्हल आयोजनादरम्यान इटावॉन लेजर जिह्यात शनिवारी रात्री अचानक गर्दी वाढल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास 100 जण जखमी झाल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी दिली. जखमींपैकी सुमारे 50 जणांवर उपचार सुरू आहेत. उत्सवावेळी एका सेलिब्रिटीच्या आगमनाची घोषणा झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोक त्या दिशेने धावू लागल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात आले. देशभरातील 400 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. या सर्व लोकांना जखमींवर उपचारासाठी तैनात करण्यात आले आहे. घटनेचे खरे कारण जाणून घेण्यासाठी अद्याप तपास सुरू आहे. 

पाश्चिमात्य देशांमध्ये हॅलोविन सण साजरा केला जातो. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हा सण साजरा केला जातो, असे मानले जाते. या दिवशी लोक वेगवेगळय़ा स्वरुपाचे मेकअप करण्याबरोबरच भीतीदायक पोशाखही घालतात.

हॅलोविनचा उगम प्राचीन सेल्टिक उत्सव सॅमहेनपासून झाला आहे. ख्रिश्चन समाजातील लोक हा सण मोठय़ा थाटामाटात साजरा करतात. हॅलोविन हा सण अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन देशांमध्ये साजरा केला जातो, परंतु या सणाचा उगम आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये झाला.

Related Stories

माकडाच्या शेपटीसारखी दाढी

Patil_p

रशियाला शस्त्रास्त्र पुरवतोय उत्तर कोरिया

Amit Kulkarni

इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा फेटाळला

Patil_p

शेमार मूर बाधित

Omkar B

पुतीन यांच्या निकटवर्तीयाला मोठा धक्का

Patil_p

दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

Archana Banage