वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्त प्रकल्प, 1.54 लाख कोटीची गुंतवणूक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वेदांता आणि फॉक्सकॉन या जागतिक पातळीवरील कंपन्यांनी गुजरातमध्ये अत्याधुनिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र संयुक्तरित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱया करण्यात आल्या आहेत. या भव्य प्रकल्पात 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून अशा प्रकारचा हा भारतातील प्रथमच उच्च तंत्रज्ञान प्रकल्प असेल.
या प्रकल्पात अत्युच्च क्षमता आणि गुणवत्तेच्या सेमीकंडक्टरसमवेतच डिस्प्ले एफएबीचे उत्पादनही केले जाणार आहे. या उत्पादनांचा लाभ भारतातील मोठे उद्योग आणि मध्यम, लघु आणि अतिलघु उद्योगांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधी ट्विटर संदेश दिला असून या प्रकल्पाची भलावण केली आहे.
गुजरात सरकारचे कौतुक
गुजरात सरकार आणि आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी एकत्रितरित्या या प्रकल्पासाठी दोन्ही कंपन्यांना मोलाचे साहाय्य केले आहे. या प्रकल्पामुळे भारतात इलेक्ट्रॉनिक उद्योगाचा कायाकल्प होणार असून तो भरभराटीला येणार आहे. भारतात यामुळे एक उच्चतांत्रिक इकोसिस्टिमचा उदय होणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करणे सहज होणार आहे. भारताला सध्या सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी विदेशांवर अवलंबून रहावे लागते. कित्येकदा यामुळे देशात सेमीकंटक्टर्सची टंचाई निर्माण होते. या सर्व समस्या या प्रकल्पामुळे दूर होण्यास साहाय्य होईल. सध्याचे युग हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचे आहे. या युगात भारताचेही मोठे योगदान असणे आवश्यक आहे. हे ध्येय या प्रकल्पामुळे साध्य होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
देशी सिलिकॉन व्हॅली
या प्रकल्पामुळे भारतातच अमेरिकेसारखी सिलिकॉन व्हॅली निर्माण होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पुढे पडले आहे. यामुळे भारताच्या डिजिटल आवश्यकता तर पूर्ण होणार आहेतच. पण सेमीकंडक्टर आणि इतर उच्चतांत्रिक साधनांची निर्यातही मोठय़ा प्रमाणावर करता येणार आहे. येत्या 10 वर्षांमध्ये भारताला सेमीकंडक्टर आणि इतर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे अग्रस्थान बनविण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्याच्या पूर्ततेत हा प्रकल्प भरीव योगदान करणार असल्याची प्रतिक्रियाही उद्योग क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे.
1,000 भूमीची आवश्यकता
या भव्य प्रकल्पासाठी वेदांता कंपनीने गुजरात सरकारकडे 405 हेक्टर किंवा 1,000 एकर विनामूल्य 99 वर्षांच्या भाडेकराराने भूमीची मागणी केली असून 20 वर्षांपर्यंत स्थायी दराने पाणी आणि वीज पुरविण्याची मागणीही केली आहे. गुजरात सरकारने या मागण्या मान्य करण्याचे ठरविले आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
बाजारपेठेचा विस्तार होणार
भारताची सेमीकंडक्टर बाजारपेठ 2020 मध्ये 15 अब्ज डॉलर्सची (साधारणतः 1 लाख 20 हजार कोटी रुपये) होती. ती 2026 पर्यंत चौपटीपेक्षा जास्त, अर्थात, 63 अब्ज डॉलर्स (साधारणतः 5 लाख कोटी रुपये) इतकी होणार आहे. सध्या जगात सेमीकंडक्टर्सचे उत्पादन मोजक्याच देशांमध्ये होते. त्यात तैवानची आघाडी आहे. भारत या क्षेत्रात अत्यंत उशीरा प्रवेश करत आहे. मात्र, हा कालापव्यय भरुन काढण्यासाठी भारताने आता अधिक वेगाने या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती देण्यात आली.