हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेची मागणी : केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
दख्खनचा राजा जोतिबा हे सिंधिया घराण्याचे दैवत आहे. जोतिबाच्या डोंगरावर सिंधिया ट्रस्टची जागाही आहे. ट्रस्टच्या माध्यमातून विविध कार्य, उपक्रम राबविण्यात येतात. तीर्थक्षेत्रात येणाऱया भाविकांना सुविधा देण्याचेही कार्य केले जाते. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री (कै.) माधवराव सिंधिया यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे ट्रस्टच्या जागेत उद्यान उभारून तेथे माधवराव सिंधिया यांचा पुतळाही उभारण्यात यावा, अशी मागणी हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेच्या वतीने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष किसनराव कल्याणकर, जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कोल्हापूर दौऱयावर आलेल्या केंद्रीय मंत्री सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ज्योतिरादित्य यांचे पिताश्री असणाऱया माधवराव सिंधिया यांचा कोल्हापूरशी स्नेह, नाते होते, याची आठवण कल्याणकर, शिंदे यांनी यावेळी करून दिली. त्याचबरोबर माजी मंत्री दिग्विजय खानविलकर आणि माधवराव सिंधिया यांचे दुर्मीळ छायाचित्रही यावेळी ज्योतिरादित्य यांना दाखविण्यात आले. जोतिबा डोंगरावर सिंधिया ट्रस्टच्या वतीने चांगली कामे सुरू आहे. या ठिकाणी पूर्वी सुंदर हत्ती होता. तो भाविकांच्या आकर्षणाचा विषय होता. नंतर तो कर्नाटकात नेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी त्याचे निधन झाले. सिंधिया ट्रस्टतर्फे एक हत्ती जोतिबा देवस्थानला देण्यात यावा, अशी मागणीही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे करण्यात आली.