रत्नागिरी शहर पोलीस स्थानक आवारातील शनिवारी दुपारची घटना : रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांची उडालीय भंबेरी : रेल्वे प्रवाशांकडील ऐवज चोरण्यात होता त्याचा हातखंडा
प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरीत रेल्वे पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास अटक केलेला सराईत चोरटा चक्क रेल्वे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने हातात बेडी असतानाच अट्टल चोरट्याने रेल्वे पोलिसांच्या हाताला जोरदार हिसका दिला आणि हातातील अडकवलेल्या बेडीसकट डोळ्यादेखत पळून गेला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या आवारात घडलेल्या या घटनेने पोलिसांची धावपळ उडाली. दत्तात्रय शिवाजी गोडसे (रा. सोलापूर) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. या पळालेल्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरभर नाकाबंदी करण्यात आली. पण कुठेही त्याचा मागमुस न लागल्यामुळे रेल्वे पोलिसांसह येथील पोलिसांचेही धाबे दणाणलेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोडसे हा सराईत चोरटा राजधानी एक्सप्रेसमध्ये चोऱ्या करत असे. त्या दरम्यान राजधानी एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांची तिकीटे तो काढायचा व प्रवासी बनून चोऱ्या करण्याचा त्याचा हातखंडा होता. कोकण रेल्वेने प्रवाशांकडील किमती ऐवज चोरून नेणाऱ्या गोडसेला यापूर्वी शहर पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान तो जामिनावर सुटलेला होता. त्यानंतर पुन्हा कोकण रेल्वेत चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या होत्या. खेड रेल्वे स्थानकादरम्यान काही दिवसांपूर्वी प्रवासात लाखो रुपयांची चोरी झाली होती. त्यामध्ये सराईत चोरटा दत्तात्रय शिवाजी गोडसे याचा हात असण्याचा संशय पोलिसांनी वर्तवला होता. त्यामुळे सर्व पोलीस यंत्रणा त्याच्या मागावर होती.
रेल्वे पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास गोडसे याला अटक केली. त्यानंतर त्याला रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात आणण्यात येत होते. येथे आणल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून तक्रार देण्यावरून चर्चा होत होती. या प्रकरणी तक्रार द्यायची कोणी, यावर दुपारपर्यंत पोलीस स्थानकात विचारविनीमय सुरू होता. दरम्यान रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या संशयित दत्तात्रय गोडसे या चोरट्याच्या हातात बेडी घालून त्याला बंद खोलीत बसवून ठेवले होते. दुपारच्या सुमारास त्याला लघुशंका झाल्याचे त्याने रेल्वे पोलिसांना सांगितले. त्यामुळे रेल्वे पोलीस त्याला पोलीस स्थानक आवारात बाथरूमला घेऊन जात होते. बाथरूमला नेत असतानाच त्याने रेल्वे पोलिसांच्या हाताला जोरदार हिसका दिला व तेथील बांधावरून उडी मारून पोलिसांच्या देखत त्याने पोबारा केला.
ताब्यातील संशयित चोरटा गोडसे पळून जाताच रेल्वे पोलिसांसह शहर पेलीस यंत्रणेचीही धावपळ उडाली. आरोपी आपल्या ताब्यातून पळून गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना देताच पोलिसांनी लगेच शहरभर त्याच्या मागावर कर्मचारी धाडले. सर्वत्र नाकाबंदी करण्याचेही फर्मान काढण्यात आले. पण सायंकाळी उशिरापर्यंत पळालेल्या चोरट्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे पोलीस यंत्रणेची त्याच्या शोधासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. अट्टल चोरटा रेल्वे पोलिसांच्या तावडीतून पळाल्याने रेल्वे पोलिसांनीही यंत्रणा गतीमान केली आहे.