सरपंच दिपाली जांभळे यांची माहिती; खुपिरे गावात स्तुत्य उपक्रम
प्रा.एस.पी.चौगले / वाकरे
पुरोगामी विचारांच्या शाहूनगरीतील खुपीरे (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने विधवा महिलांच्या सन्मानार्थ येत्या १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीमती कोमल राम पाटील या विधवा प्रथा झुगारलेल्या रणरागिणी महिलेला एक दिवसाकरिता प्रतिकात्मक सरपंचपदाचा मान देऊन त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण केले जाणार असल्याचे सरपंच दिपाली जांभळे यांनी सांगितले.
शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षात त्यांच्या पुरोगामी विचारांना पुढे नेण्याच्या उद्देशाने खुपिरे ग्रामपंचायतीने मासिक सभेत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी त्यांना एकदिवसीय प्रतिकात्मक सरपंच करून ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात येणार असल्याचे सरपंच जांभळे यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव जिल्हापरिषद आणि पंचायत समितीकडे पाठवण्यात आला आहे. यावेळी उपसरपंच युवराज पाटील, सदस्य सागर पाटील, भगवान हराळे, अमर कांबळे, सचिन कुंभार, युवराज पाटील, शिलाबाई चौगले, तृप्ती पाटील, वनिता कांबळे, संगीता कांबळे, रेखा सुतार, संगीता कोळी ग्रामविकास अधिकारी तब्बसुम अत्तार, सरपंच संग्राम भापकर, तानाजी पाटील- गवळी व कुटुंबातील सर्व महिला उपस्थित होत्या.
विधवा महिलेचा सन्मान
सरपंच दीपाली जांभळे यांनी विधवा प्रथा झुगारणाऱ्या कोमल पाटील यांचा ग्रामपंचायत खूपिरेच्यावतीने सोमवारी साडी चोळी देऊन व हळदी कुंकू कार्यक्रम करून सन्मान करून शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांना चालना दिली आहे.
सरपंच दीपाली जांभळे