लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या सुषमा वेंगुर्लेकर यांचे उद्गार : फोंडा येथे लायन्स क्लबचा शिक्षक दिन कार्यक्रम
प्रतिनिधी /फोंडा
शिक्षक हा ध्येयनिष्ठ, विचारवंत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया घालणारा आणि देशासाठी सुसंस्कृत आदर्शवादी, लोकोपयोगी, देशप्रेमी नागरिक घडविणारी एक शक्ती आहे, असे उद्गार लायन्स क्लब इंटरनॅशनल चेअरपर्सन सुषमा वेंगुर्लेकर यांनी फोंडा शहर लायन्स क्लबने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले.
व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष उमा गायतोंडे, सचिव अर्चना तेंडुलकर, झोन चेअरपर्सन सुनिता पार्सेकर, कार्याध्यक्ष संदीप तेंडुलकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते निवृत्त मुख्याध्यापक दामोदर पंचवाडकर, पी. के. नाईक यांचा श्रीफळ, शाल व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्लबच्या अध्यक्षा उमा गायतोंडे यांनी स्वागत केले. अर्चना तेंडुलकर यांनी अहवाल वाचन केले. सीमा केसरकर यांनी प्रार्थना म्हटली. शांता नायक व आनंद नेवरेकर यांनी दोन्ही शिक्षकांची ओळख करुन दिली. यावेळी माजी शिक्षक सुनिता पार्सेकर, दिवाकर शिंक्रे व स्मिता शिंक्रे, आनंद व शिला नेवरेकर, निला कटोच यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सुनिल केसरकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. तनया केसरकर यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप तेंडुलकर यांनी आभार मानले.