पुणे : हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर सोमवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर त्यांनी धारदार हत्यारांनी त्याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता बंडगार्डन पोलिसांची दोन पथके, हडपसर पोलिसांचे एक पथक तसेच गुन्हे शाखेची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यातील तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्याआधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
याप्रकरणी सागर ओव्हाळ, बाळा ओव्हळ, इनामदार असे तीन संशयीत आरोपी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत. याबाबत तुषार नामदेवराव हंबीर (35, रा. गोंधळेनगर, हडपसर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात कट रचणे खुनाचा प्रयत्न, आर्मॲक्ट, तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : सत्ताप्राप्तीसाठी राजकारणात कुणालाही पक्षप्रवेश; गिरीश बापट यांचा भाजपाला घरचा आहेर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंड तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचे काम करत असून, तो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुह्यात आरोपी आहेत. त्याला हाडांचा व स्नायू दुखण्याचा त्रास होत असून, त्याला चालण्यासाठी त्रास होतो. त्या निमित्ताने त्याला वारंवार रूग्णालयात उपचाराकामी ससून रूग्णालयात न्यूरो-ऑर्थो डॉक्टरकडे यावे लागते. त्याला चालण्याचा त्रास होत असल्याने 25 ऑगस्ट रोजी तो ससून रूग्णालयात उपचारासाठी आला असताना त्याला डॉक्टरांनी रूग्णालयातील इन्फोसीस बिल्डींगमधील तिसऱया मजल्यावर दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना पाच जणांचे टोळके रूग्णालयात हत्यारासह शिरले. या ठिकाणी मुख्यातील पोलीस कर्मचारी गस्तीसाठी नेमलेले होते. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास टोळक्मयातील एकाने पिस्तुल बाहेर काढले. पिस्तुलातून गोळी झाडून हंबीर याला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळीच फायर झाली नाही. याच वेळी तलवार, कोयत्याने वार करत असताना तेथे असलेले गार्ड बागड व हंबीरच्या यांचा मेव्हणा मध्ये पडला. यावेळी त्यांच्या हातावर वार झाले. यावेळी एकाने तलावरीने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ठिकाणी गोंधळ उडाल्याने व पोलीस गार्डने रायफल काढल्याने पाचही जण घटनास्थळावरून पळून गेले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर आणि तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन पवार गुह्याचा तपास करत आहेत.