गावकऱ्यांच्या तावडीतून निसटताना गेला जीव
प्रतिनिधी/अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कमेसह दागिने घेऊन बाहेर चोर जात असताना गावातील युवकांना याची चाहूल लागली. तात्काळ गावातील काही युवकांनी चोराचा पाठलाग सुरू केला. चोर हा युवकांच्या तावडीतून सुटण्यासाठी दिसेल त्या मार्गाने तो पळू लागला या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली.
तात्काळ गावातील युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत चोरट्याचा त्या विहिरीतच जीव गेला. ही घटना कळताच अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब काकडे, उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलीस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान गावातील युवक व ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली. विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी जीवरक्षकांना बोलवण्यात आले. दोन मोटारीच्या सहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यात आले, त्यानंतर जीवरक्षकांना बोलवण्यात आले. जीवरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे, महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.