अखेर विराटने झळकावले बहुप्रतिक्षित 71 वे शतक! 90 मिनिटांच्या खेळीत 200 चा स्ट्राईकरेट अन् 122 धावांची आतषबाजी, भारताची अफगाणवर 101 धावांनी मात


वृत्तसंस्था /दुबई
नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकात्यातील बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटी आठवा! विराटने पहिल्या डावात 194 चेंडूत 18 चौकारांसह 136 धावा फटकावल्या. विराटचे ते 70 वे शतक! पण, त्यानंतर अचानक त्याचा शतकांचा ओघ आटला. इतका आटला की तब्बल हजारभर दिवस त्याला एकही शतक झळकावता आले नाही. गुरुवारचा दिवस मात्र सपशेल अपवाद ठरला. रोहितला विश्रांती दिली गेल्याने विराट सलामीला बढतीवर आला आणि मैदानाच्या चोहो बाजूने जोरदार फटकेबाजी करत त्याने अखेर बहुप्रतिक्षित 71 वे शतक फटकावले! फरीदच्या शॉर्ट ऑफ लेंग्थ चेंडूवर डीप मिडविकेटवरुन उत्तुंग षटकार खेचला आणि त्याच क्षणी सातत्याने हुलकावणी देणाऱया या शतकाला त्याने अखेर खिंडीत गाठले! अन् हो! या बहुप्रतिक्षित शतकानंतर तो आपली पत्नी अनुष्काला अजिबात विसरला नाही. स्टेडियमवरील हजारो चाहत्यांच्या साक्षीने त्याने वेडिंग रिंगचे चुंबन घेत शतकाचा आनंद मैदानावर साजरा केला!
विराट कोहलीने 61 चेंडूत 12 चौकार व 6 षटकारांसह 122 धावांची शतकी खेळी साकारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला शतकी दुष्काळ अखेर संपुष्टात आणला आणि भारताने या बळावर आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीत अफगाणविरुद्ध 2 बाद 212 धावांचा डोंगर रचला. विराटचे हे नोव्हेंबर 2019 नंतर पहिलेच आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 71 वे शतक ठरले. टी-20 क्रिकेटमध्येही त्याचे हे पहिले शतक आहे. प्रत्युत्तरात अफगाणला 20 षटकात 8 बाद 111 धावांवर समाधान मानावे लागले.
नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्यानंतर हंगामी कर्णधार केएल राहुल (41 चेंडूत 62) व विराट यांनी 76 चेंडूतच 119 धावांची भरभक्कम सलामी दिली. कोहलीने सलामीला फलंदाजीला उतरत अखेरपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम केला आणि यावेळी गोलंदाजांची चौफेर धुलाई करत त्याने भात्यातील एकापेक्षा एक सरस फटक्यांचा जणू नजराणाच सादर केला.
दोन्ही सलामीवीरांनी विशेषतः फिरकीपटूंवर जोरकस हल्ला चढवला. रशिद खानला यामुळे एकही यश मिळाले नाही. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर व्हिन्टेज कोहलीची झलक भारतीय क्रिकेट वर्तुळासाठी विशेष सुखावणारी ठरली.
कोहली एरवी स्वीपचा फटका फारसा खेळत नाही. पण, येथे त्याने स्वीपचाही पुरेपूर वापर केला. मुजीब रहमानच्या डावातील सहाव्या षटकात पहिला स्वीप मारल्यानंतर त्याने पुढे सरसावत खेचलेला उत्तुंग षटकार आणखी प्रेक्षणीय ठरला. आठव्या षटकात डीपमध्ये मोहम्मद नबीने जीवदान दिल्याने शतकवीर विराट प्रारंभीच सुदैवी ठरला होता.
विराट-केएलच्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताने 10 षटकात बिनबाद 87 धावांची मजल मारली होती. शेवटच्या पाच षटकात तर विराटने चौकार-षटकारांचा जणू सिलसिलाच सुरु केला. पेसर फरीद अहमदच्या गोलंदाजीवर पूलचा अप्रतिम फटका लगावत त्याने शतक पूर्ण केले आणि हेल्मेट काढून नेकलेसचे चुंबन घेत शतकाचा आनंद अगदी थाटात साजरा केला. फझलहक फारुकीला 2 षटकार व एक चौकारासाठी फटकावत त्याने यादरम्यान भारताला द्विशतकी टप्पाही पार करुन दिला. नंतर क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या चेहऱयावरील स्मित हास्य त्याला शतकाने जो दिलासा दिला, त्याचीच प्रचिती देत होते!
संक्षिप्त धावफलक
भारत : 20 षटकात 2 बाद 212 (61 चेंडूत 12 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 122, केएल राहुल 41 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह 62, सूर्यकुमार यादव 6, रिषभ पंत नाबाद 20. अवांतर 2. फरीद अहमद 2-57)
अफगाण : 20 षटकात 8 बाद 111 (इब्राहिम झॅद्रन 59 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 64. भुवनेश्वर 4 षटकात 4 धावात 5 बळी, अर्शदीप, अश्विन, हुडा प्रत्येकी 1 बळी)