वृत्तसंस्था/ मेलबर्न
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे ‘तळपदार’ कामगिरी करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक हजार टप्पा गाठणारा भारताचा पहिला व एकंदर दुसरा फलंदाज बनला आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सुपर 12 फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याने हा माईलस्टोन गाठला. त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला या सामन्यात आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्याने केवळ 25 चेंडूत नाबाद 61 झोडपल्या, त्यात 6 चौकार, 4 षटकारांचा समावेश होता. त्याने 244.00 स्ट्राईकरेटने या धावा फटकावल्या. त्याने यावर्षातील 28 डावांत 1026 धावा 44.60 च्या सरासरीने जमविल्या असून त्यात एक शतक व 9 अर्धशतकांचा समावेश आहे. 117 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचा एकंदर स्ट्राईकरेट 186.24 इतका आहे.
एका कॅलेंडर वर्षात हजारहून अधिक धावा जमविणारा सूर्या हा केवळ दुसरा फलंदाज आहे. याआधी 2021 मध्ये पाकचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने 73.66 च्या सरासरीने 1326 धावा जमविल्या होत्या. त्यात एक शतक व 12 अर्धशतकांचा समावेश होता. नाबाद 104 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.