भाग्यनगर येथे अपघात : टिप्पर चालक फरारी
प्रतिनिधी/ बेळगाव
भरधाव टिप्परने सायकलला ठोकरल्याने शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. शुक्रवारी सायंकाळी भाग्यनगर परिसरात ही घटना घडली असून अपघातानंतर आपले वाहन तेथेच सोडून टिप्पर चालकाने पलायन केले आहे. या घटनेनंतर अवजड वाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रवीण महादेव शिंदे (वय 13 रा. आठवा क्रॉस, संत रोहिदासनगर अनगोळ) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव असून सायकलवरून घरी जाताना भरधाव टिप्परने ठोकरल्याने तो जागीच ठार झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व शाळकरी मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवीण हा टिळकवाडी येथील व्ही. एम. शानभाग शाळेत सातवीत शिकत होता. शुक्रवारी शाळेची एक दिवसाची सहल गेली होती. सहल संपवून शाळेतून सायकलवरून घरी जाताना टिप्परची धडक बसून तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश देऊ नये
अपघातानंतर टिप्पर चालकाने आपले वाहन तेथेच उभे करून पलायन केले. रात्री टिप्पर चालकावर एफआयआर दाखल झाला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत. अपघात झालेल्या परिसरात अनेक शिक्षण संस्था आहेत. या परिसरात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी आहे.