भाजपसमोर आप अन् आदिवासी समुदायाच्या नाराजीचे आव्हान
दक्षिण गुजरात सत्तारुढ भाजपसाठी मोठे आव्हान ठरत चालला आहे. येथे आम आदमी पक्ष आणि स्थानिक आदिवासी समुदायांकडून विविध प्रकल्पांमुळे होत असलेला विरोध कारणीभूत आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर रोजी एकूण 89 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यातील 35 जागा या दक्षिण गुजरातमधील आहेत. दक्षिण गुजरातमधील भरुच, नर्मदा, तापी, डांग, सूरत, वलसाड नवसारी येथील मतदारसंघांमध्ये मतदान पहिल्या टप्प्यात होणार आहे.
2017 च्या निवडणुकीत भाजपने येथील 35 पैकी 25 जागांवर यश मिळविले होते. तर काँग्रेसने 8 आणि भारतीय ट्रायबल पार्टीने 2 जागा मिळविल्या होत्या. अनुसूचित जमातींसाठी राखीव 14 जागांपैकी 5 जागांवर भाजपने विजय मिळविला होता. यानंतर डांग आणि करपादामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला यश मिळाले होते. गुजरातचा आदिवासीबहुल भाग भाजपसाठी काहीसा आव्हानात्मक आहे, परंतु येथील शहरी भागांमध्ये भाजपने चांगला प्रभाव निर्माण केला आहे.
पाटीदारांचा बालेकिल्ला सूरत
सूरतला पाटीदार समुदायाचा बालेकिल्ला मानले जाते. 2015 मध्ये येथे पाटीदार समुदायाची तीव्र निदर्शने झाली होती. तसेच येथे मोठय़ा प्रमाणावर हिंसा झाली होती. येथील वस्त्राsद्योग क्षेत्रातील निगडित व्यापाऱयांनी जीएसटीच्या विरोधातील निदर्शनांमध्ये भाग घेतला होता. तरीही भाजपने सूरतमधील 16 जागांपैकी 15 जागांवर विजय मिळवत राजकीय पंडितांना खोटे ठरविले होते. इतकेच नव्हे तर पाटीदारबहुल वराछा, कामरेज, कतारगम या मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. भाजपला केवळ मांडवी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.
‘आप’ची एंट्री
मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम आदमी पक्षाने स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले होते. आम आदमी पक्षाने सूरत महापालिकेत 27 जागांवर विजय मिळवत अन्य पक्षांना भविष्यात आव्हान देण्याचे संकेत दिले होते. काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. आम आदमी पक्षाने हार्दिक पटेलचे निकटवर्तीय अल्पेश कठारियाला वराछा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. तर पक्षाने गोपाल इटालिया यांना कतारगम मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. पाटीदार समुदायाचे समर्थन प्राप्त होईल अशी अपेक्षा ‘आप’ला वाटत आहे.
केजरीवालांकडून जोरदार प्रचार
मागील निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी फारसा प्रचार केला नव्हता. परंतु यंदा पक्षाचे नेतृत्व राज्यात पूर्ण शक्तिनिशी प्रचार करत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केल्याने उत्साह दुणावला आहे. डांग, करपाडा, उमरगाम, धर्मपूर, गंडवी, महुआ, मंगरोळ या आदिवासीबहुल मतदारसंघांमध्ये सध्या भाजपचा आमदार आहे. काँग्रेससाठी युवा आदिवासी चेहरे म्हणून अनंत पटेल यांचे नाव घेतले जात आहे. पटेल हे नवसारी आणि वलसाड जिहय़ात होणाऱया निदर्शनांमध्ये सर्वात आघाडीवर होते. येथे महामार्गासाठीच्या भूमी संपादनाला विरोध दर्शवित निदर्शने करण्यात आली होती.