मिरजेच्या तरूणाचा भुईबावडा घाटात मृत्यू
प्रतिनिधी/ गगनबावडा
भुईबावडा घाटातील धबधब्यावर आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रोशन यशवंत चव्हाण वय 29 रा कापडपेठ, मिरज जि.सांगली असे त्या युवकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली. माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सांगली येथील दहाजण धनंजय बेलवलकर यांच्या वेंगसर येथील घरी आले होते. दोन वाहने घेऊन आलेल्या पर्यटकांमध्ये कौस्तुभ नागवेकर, प्रवीण पाटील, उमेश सुतार, रमेश सुतार, प्रशांत बडवणे, प्रकाश सुतार, धनंजय बेलवलकर, उदय बेलवलकर, रोहन चव्हाण आदींचा समावेश होता. भुईबावडा घाटात वाहणाऱया धबधब्यामध्ये ते आंघोळीसाठी उतरले होते. आंघोळ करत असताना रोशन चव्हाण हा पर्यटक मोरीतून वाहत जात खाली दरीत पडला. या घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी गगनबावडा पोलिसांना दिली. त्यानंतर वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक प्रवीण देसाई, उपनिरीक्षक सुरज पाटील, अभिजीत तावडे, विलास राठोड, पडीलकर घटनास्थळी दाखल झाले. गगनबावडा येथील काही ग्रामस्थ व पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान करुळ येथील सह्याद्री जीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढला. तपास पोलीस करत आहेत.