वार्ताहर /माशेल
माशेल येथील श्री देवकीकृष्ण मंदिरात रातकाला मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. द्वादशी दिवशी सकाळी अभिषेक, पुजाआरती, नैवेद्य व रात्रो पालखी उत्सव झाल्यानंतर पांरपारिक शेकडो वर्षाची परंपरा असलेला स्थानिक कलाकारांचा रात्रकाला झाला.
रातकाल्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही युला कलाकारांनी शाबूत ठेवलेली आहे. पुर्वी हा काला कै. लक्ष्मण भगत, कै.पांडू सावळ, कै. विश्राम सावळ. कै. बोडको देसाई, कै. वसंत भगत, कै. नोनलो गावकर हे कलाकार राज्यभरात अनेक ठिकाणी काल्याचे कार्यक्रम करायचे. यावेळी त्याच्यासमवेत भगवान श्री कृष्णाची मुर्ती कायम असायची.
माशेलात साकारला जातोय रातकाला
शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत कै. वसंत भगत यांचा मुलगा राजेंद्र भगत यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळीत रातकाल्याची परंपरा कायम ठेवलेली आहे. पुर्वीप्रमाणे ही मंडळी गोव्यात सर्वत्र काला साजरा करीत नसून अवघ्या थोडय़ाच ठिकाणी हा काला सादर करतात. या काल्यात राजेंद भगत मुख्य हरिदासाची भूमिका साकारतात तर इतर कलाकारांमध्ये नंदकुमार गावकर, तायानाथ आमोणकर,चंद्रकांत जल्मी, व्यंकटेश तिवरेकर, रघुवीर गावकर, अरूण परब, कृष्णा परब, आदिशेष शिरोडकर, पांडुरंग जल्मी शिवाय तुळशीदास नावेलकर, मिलींद परब यांनी भाग घेतला.