खोलीतून बाहेर पडत रेल्वेत पोहोचतात प्रवासी
जगात अनेक नैसर्गिक आश्चर्य आहेत, तर माणसांनीही इंजिनियरिंगद्वारे अशा गोष्टी निर्माण केल्या आहेत, ज्यांना पाहिल्यावर प्रथमदर्शनी विश्वासच बसत नाही. सर्वसाधारणपणे रेल्वेमार्ग नागरी भागापासून काही अंतरावर तयार करण्यात येतो. मेट्रोचे मार्ग देखील जमिनीवर किंवा भूमिगत असतात. परंतु एक रेल्वेमार्ग 19 मजली नागरी इमारतीच्या मधून जातो.
एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात नागरी वस्तीच्या आतून रेल्वे जात असल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ खरा असून चीनमध्ये एक रेल्वे नागरी इमारतीच्या आतून बाहेर पडते. हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून संचालित केला जात असून यामुळे लोकांनाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही.
दक्षिण पूर्व चीनमधील माउंटेन सिटी चंक्विंगची लोकसंख्या कोटय़वधीत आहे. बहुमजली इमारती असलेल्या या शहरात जागा अत्यंत कमी असल्याने मोनो ट्रेन चालविण्यासाठीही जागा शिल्लक नाही. तेथे एक रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू झाल्यावर एक 19 मजली इमारतीचा अडथळा निर्माण झाला.
अन्य एखादा देश असता तर ही इमारत हटविण्यात आली असती. परंतु चीनच्या इंजिनियर्सनी काही वेगळेच करून दाखविले. त्यांनी 19 मजली इमारतीच्या 6 व्या आणि 8 व्या मजल्यामधून थेट रेल्वेमार्ग तयार केला. आता ही रेल्वे स्वतःच्या याच वैशिष्टय़ामुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे. चीनमध्ये माउंटन सिटी म्हणून प्रसिद्ध या ठिकाणी 3 कोटींपेक्षा अधिक लोक राहतात, त्यांच्यासाठी ही रेल्वे अत्यंत सुविधाजनक आहे.
इमारतीत रेल्वेस्थानक
ट्विटरवर या अनोख्या रेल्वेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पसंती दर्शविली आहे. रेल्वे जात असताना कुणालाही त्रास होऊ नये अशाप्रकारे या इमारतीत बदल करण्यात आले आहेत. तर या इमारतीच्या लोकांसाठी स्वतःचे स्थानक देखील आहे. येथून ते थेट रेल्वेत दाखल होऊ शकतात. सायलेंसिंग तंत्रज्ञानाद्वारे रेल्वेचा आवाज कमी करण्यात आल्याने ती एखाद्या डिशवॉशर इतकाच आवाज करते.