उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्हय़ात एक अनोखी बँक कार्यरत आहे. मात्र ही बँक नेहमी प्रमाणे पैशांची नसून झाडांची बिजे आणि कोयींची आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी या बँकेचे कामकाज स्वयंसेवकगिरी करून पाहतात. या बँकेत विविध प्रकारच्या वृक्षांच्या बिया आणि कोयी यांची साठवणूक करण्यात आली आहे. दरवर्षी बँकेच्या साठय़ातील काही बिजे आणि कोयी जमिनीत रुजवून त्यांची रोपे बनविली जातात. आणि ती वृक्षप्रेमींना तसेच शेतकऱयांना पुरविली जातात. या रोपटय़ांच्या माध्यमातून जणू पृथ्वी श्रृंगारली जाते.
प्राथमिक विद्यालयातील शिक्षिका स्नेहील पांडे यांच्या नेतृत्वात 300 विद्यार्थी या अनोख्या बँकेचे व्यवस्थापन पाहतात. या विद्यार्थ्यांमधूनच बँकेचा मुख्य व्यवस्थापक, साहाय्यक व्यवस्थापक, कॅशिअर आणि कर्मचारी तयार करण्यात आलेले आहेत. पैशांच्या बँकेप्रमाणेच याही बँकेचे कामकाज चालते. येथे नागरिक खाते उघडून आपल्याकडील वृक्ष बिजे किंवा कोयी यांचे डिपॉझिट ठेऊ शकतात. तसेच त्या बिजांपासून तयार झालेली रोपे घेऊन जाऊ शकतात. या सेवेसाठी कमीतकमी पैसे आकारण्यात येतात. आजवर हजारो लोकांनी या बँकेचा लाभ उठविला आहे. बिजे जमिनीत पेरल्यानंतर रोपे मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही शालेय विद्यार्थीच बँकेचे कर्मचारी या नात्याने स्वीकारतात.