हाडं गोठवून टाकणाऱया थंडीत सरोवरात मारतात उडी
पेटत्या निखाऱयांवर चालणे, दीर्घकाळापर्यंत अन्न आणि पाणी त्यागणे अशा अनेक प्रथा आणि परंपरा आजही रुढ आहेत. अशीच एक परंपरा स्वीत्झर्लंडमध्ये अनेक वर्षांपासून पाळली जात आहे. या परंपरेपोटी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता लोक तेथे सरोवरात उडी घेत असतात.
या परंपरेचे पालन करण्यासाठी हजारो लोक जेनेव्हा सरोवराच्या काठावर पोहोचतात आणि मग हाडं गोठविणाऱया थंडीत पाण्यात उडी घेतात. नाताळाच्या आसपास ही विचित्र आणि असामन्य परंपरा स्वीत्झर्लंडमध्ये 8 दशकांपासून चालत आली आहे.
येथील सरोवराच्या पाण्याचे तापमान यावेळी सुमारे 8.8 अंश सेल्सिअस होते, तरीही या परंपरेत भाग घेणाऱया लोकांनी यात उडी घेत 100 मीटरपर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली आहे. यामागे केवळ एकच कारण आहे आणि ते म्हणजे ख्रिसमस कप.
या विचित्र परंपरेची क्षणचित्रे ऑनलाईन प्रसारित झाली आहेत. हजारो लोक सुपरहीरो आणि पऱयांच्या कहाण्यांमधील पात्रांप्रमाणे सरोवराच्या काठावर पोहोचले आणि त्यांनी पाण्यात उडी घेतल्याचे यात दिसून येते. ही परंपरा नवी नसून 1934 पासून चालत आली आहे. दोन दिवसीय कार्यक्रम स्वीत्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये आयोजित होतो. ख्रिसमस 2022 कार्यक्रमात हौशी आणि पारंगत 4 हजार जलतरणपटूंनी भागीदारी करत ख्रिसमस कपसाठीचा आतापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. या पंरपरेबद्दल वाढती लोकप्रियता मागील काही वर्षांमध्ये दिसून आली आहे. या स्पर्धेदरम्यान तेथील तापमान उणे 2 अंश सेल्सिअस इतके होते.