सोमवारी 44 नवे बाधित : एकूण 475 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी /पणजी
सुमारे दोन-तीन महिन्याच्या अंतराने गेल्या 24 तासात म्हणजे काल सोमवारी कोरोनाच्या एका बळीची नोंद झाली असून स्थिर असलेली एकूण बळींची संख्या 1 ने वाढून 3833 झाली आहे. शिवाय 44 नवे रुग्ण सापडले असून त्यातील 2 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर 42 जणांना होम हायसोलेशन देण्यात आले आहे. एकूण सक्रिय रुग्णसंख्या 475 वर पोहोचली आहे तर 41 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
कालच्या दिवसभरात 854 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील 44 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या अनेक दिवसांपासून 50 च्या आसपास नवीन रुग्ण सापडत असून ती संख्या अजूनही कमी होत नाही. काहीवेळा दिवसाची ही संख्या 70 ते 76 पर्यंत गेली होती. रोज नवीन कोरोना बाधित सापडत असले तरी त्यांच्यावर घरीच उपचार होऊन ते बरे होत आहेत. अधिकजणांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागत नव्हती. त्याचबरोबर गेल्या दोन तीन महिन्यांपासून 3832 अशी मृत्यूंची संख्याही स्थिर होती. कोणाचाही बळी गेला नव्हता तर हॉस्पिटलमध्येही फारशी भरती होत नव्हती.
पुन्हा चिंता वाढू लागली
आता काल सोमवारी कोरोनामुळे 1 बळी गेल्याने व 2 जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली असून हॉस्पिटलमधून एका रुग्णाला घरी पाठवण्यात आले आहे.
चौथ्या लाटेचा वाढता प्रभाव
सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत मिळून एकूण राज्यात 2,46,508 जणांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यातील 2,42,200 जण कोरोनातून बरे झाले. यापुर्वीच्या तीनही लांटांमध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग राज्यात दिसून आला. अनेकांना हॉस्पिटलमध्ये भरती करावी लागले होते. बळींची संख्याही दिवसेदिवस वाढली होती. मात्र आता चौथ्या लाटेचाही हळुहळू संसर्ग वाढू लागल्याचे गेल्या पंधरा दिवसांपासून दिसून आले आहे.
सर्वांनी काळजी घ्यावी
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सरकारने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. निर्बंध लादल्यास फार मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे सर्वांनी पाळायला हवे. तसेच प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीची उपाययोजना करावी. तसेच बूस्टर डोसही घ्यावा. ज्यांनी लसीकरण केलेले नाही त्यांनी ते करावे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण करण्यात यावे, असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.